सातारा : नोटाबंदीच्या निर्णयानंतर आयकर विभाग आणि पोलिसांनी देशभरात ठिकठिकाणी छापे टाकून कोट्यवधींचे मूल्य असलेल्या नव्या आणि जुन्या नोटा जप्त करण्याचे सत्र सुरू ठेवले असून, आता जिल्हा बँकाही आयकर विभागाच्या रडारवर आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने आज सातारा जिल्हा बँकेवर छापा टाकला आहे. नोटाबंदीनंतर बँकेत जमा झालेल्या नोटांच्या तपशीलाची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

दुपारी 12.30 च्या दरम्यान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची तातडीची बैठक झाल्यानंतर आयकर उपसंचालक स्वामी पी. एस. व आयकर उपायुक्त आर. एस. पावशे यांच्यासह 9 लेखापाल अधिकार्यांचे पथक जिल्हा बँकेत दाखल झाले. आणि त्यांनी जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनाकडून माहिती घेऊन तपासणीला सुरुवात केली. यामध्ये मोदी सरकारने 8 नोव्हेंबर रोजी निश्चली करण्याचा निर्णय जाहीर केला होता. नोटा स्वीकारण्याची मुदत बँकांना पाचच दिवस मिळाली. त्यानंतर जिल्हा बँकांच्या व्यवहारावर निर्बंध घालण्यात आले होते. या पाच दिवसात सातारा जिल्हा बँकेने जुन्या नोटांच्या किती रक्कमा स्वीकारल्या याची तपशीलवार माहिती पहिल्या सत्रात घेण्यात आली. त्यानंतर (नो युवर कस्टमर) केवायसी प्रक्रियेची माहिती घेण्यात आली. जिल्हा बँकेने या दरम्यान, सर्व शाखांचे कामकाज सुरळीत चालू राहण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून प्राप्त झालेले 165 कोटी रुपयांचे वितरण केले होते. याही व्यवहाराची उपायुक्त पावशे यांनी माहिती घेतली. याशिवाय एनपीए व जुन्या नोटांचे रिझर्व्ह बँकेला देण्यात आलेले तपशील याची प्रक्रिया समजून घेण्यामध्ये लेखापालांनी व्यवस्थापनाच्या अधिकार्यांना चांगलेच घायकुतीला आणले. रात्री 7 च्या नंतर पथकाने चौथ्या मजल्यावरील लॉकरकडे मोर्चा वळवला. उशीरापर्यंत लॉकरही तपासून पाहण्याची प्रक्रिया सुरुच असल्याची माहिती समोर येत होती. यासंदर्भात ना बँकेच्या कर्मचार्यांनी ना आयकर विभागाच्या अधिकार्यांनी कोणतीच माहिती दिली नाही. त्यामुळे लॉकरमध्ये दडलय काय? हा प्रश्न गुलदस्त्यातच राहिला.
या संपूर्ण प्रक्रिये संदर्भात प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली होती. संचालक मंडळासह बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचार्यांना रात्री उशीरापर्यंत थांबवून ठेवण्यात आले होते. या तपासणीच्या निमित्ताने जिल्हा बँकेवर छापा पडून लॉकर सील झाल्याच्या अफवांचा बाजार सातार्यात गरम झाला होता. त्यामुळे जिल्हा बँकेचे दूरध्वनी सातत्याने खणखणत होते. नक्की काय घडले याचा अंदाज राजकीय वर्तुळातून घेतला जात होता. यासंदर्भात जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी बँकेवर छापा पडल्याचा स्पष्टपणे इन्कार केला. संपूर्ण माहिती घेऊनच अन्वयार्थ लावा असे सरकाळे यांनी थेट सूचवले. ही रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार आयकर विभागाने नोटीस देवून केलेली रुटीन तपासणी आहे. बँकेचे सर्व व्यवहार नियमानुसारच आहेत. केवायसी प्रक्रिया 98 टक्के पूर्ण झाली असून सर्व कर्ज वितरण आर्थिक चौकटीतीलच आहे. त्यामुळे खातेदारांनी घाबरुन जाण्याची गरज नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
देशातील काळ्या पशाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी 500 व 100 च्या नोटा चलनातून बंद केल्याची घोषणा केली. या निर्णयानंतर नोटा स्वीकारण्याचे अधिकार जिल्हा बँकांना मिळाले होते. मात्र जिल्हा बँकांमध्ये नोटा भरण्याच्या प्रमाणात लक्षणीय प्रमाणात वाढ होत आहे, असे निर्दशनास आल्याने केंद्र सरकारने जिल्हा बँकांना नोटा स्वीकारण्यास मज्जाव केला. दरम्यान, सुरवातीच्या तीन-चार दिवसांत ज्या नोटा घेतल्या गेल्या त्याची चौकशी नाबार्डने सुरू केली आहे. रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीच्या काळात ज्या खात्यांवर 2 लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. अशांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाबार्डच्या अधिकार्यांनी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रधान कार्यालयाजवळ इचलकरंजी, पेठवडगाव, कुरुंदवाड, आजरा येथील शाखेमधील व्यवहाराची चौकशी केली होती.