साताराः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वा. राष्ट्राला उद्देशून भाषण केले व त्यामध्ये त्यांनी रूपये 1000 व 500 च्या नोटा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. केंद्र सरकारच्या आदेशानुसार 9 नोव्हेंबर रोजी बँका बंद ठेवण्यात आल्या. दि. 10 नोव्हेंबरपासून सर्व बँकांनी जुन्या नोटा बदलून नवीन रू.2000 च्या चलनी नोटा व रू.100 च्या नोटा देण्यास सुरवात केली. गेले 8 दिवस सर्वच बँकामध्ये सर्वसामान्य नागरिक व खातेदारांनी मोठया प्रमाणावर गर्दी करून जुन्या नोटा बदलून घेतल्या अथवा खात्यात जमा केल्या.
नागरिकांची अडचण लक्षात घेवून आयडीबीआय बॅकेच्या सातारा विभागीय कार्यालयाने मोबाईल व्हॅन द्वारा नोटा बदलून देण्याचा उपक्रम वेगवेगळया गावामध्ये राबविण्यात सुरवात केली असून त्यास नागरिकांचा व खातेदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आयडीबीआय बँकेचे उपमहाप्रबंधक अनिल गोडबोले यांनी निवेदनाद्वारे नोटा बदलून देण्याच्या उपक्रमाची माहिती दिली असून सर्व नागरिक व आयडीबीआय बॅकेच्या खातेदारांनी या सुविधेचा फायदा घ्यावा. नोटा बदलून देण्याचा हा उपक्रम दि. 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत विविध गावांमध्ये राबविण्यात येईल. आवश्यकतेनुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल.