Friday, March 28, 2025
Homeठळक घडामोडीविधान परिषदेसाठी सातारा-सांगली मतदार संघात 99.82 टक्के विक्रमी मतदान

विधान परिषदेसाठी सातारा-सांगली मतदार संघात 99.82 टक्के विक्रमी मतदान

8 मतदान केंद्रातून 99.82 टक्के सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क
सातारा : सांगली-सातारा जिल्ह्यातील 8 मतदान केंद्रावर मतदान तब्बल 99.82 टक्के मतदान झालं. या निवडणूकीसाठी चार उमेदवार रिंगणात असले तरी काँग्रेसचे मोहनराव कदम विरुद्ध राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. यासाठी सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील आठ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया झाली.
सातारा-सांगली हा राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला, पण या वेळी या बालेकिल्ल्यातच धुसफुस सुरू झाली आहे. अजित पवार यांनी शेखर गोरे यांना पक्षात आणून उमेदवारी दिल्याने पक्षात नाराजीची भावना आहे. जयंत पाटील, उदयनराजे भोसले या सार्‍यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
विधान परिषद निवडणुकांच्या सहा जागांसाठी शांततेमध्ये मतदान झालं. पुणे, नांदेड, भंडारा-गोंदिया, यवतमाळ, जळगाव आणि सांगली-सातारा या सहा जागांसाठी हे मतदान पार पडलं. या निवडणुकांचे निकाल 22 तारखेला लागणार आहेत.
पुण्यातल्या जागेसाठी 94.20 टक्के मतदान झालं. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या प्रतिष्ठेची लढाई आहे. त्यामुळं पुण्याच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष आहे. या निवडणुकीसाठी पाच उमेदवार रिंगणात होते. मात्र खरी लढत विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले, काँग्रेसचे संजय जगताप आणि भाजपचे अशोक येनपुरे यांच्यामध्ये झाली. दोन महापालिका, जिल्हा परिषद, तीन कँटोन्मेंट बोर्ड आणि 11 नगरपरिषदांच्या नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला.
तर नांदेड जिल्ह्यामध्ये आठ ठिकाणी 99.79 टक्के मतदान झालं. काँग्रेस विरूद्ध सर्व पक्षीय पुरुस्कृत अपक्ष उमेदवारात ही चुरशीची लढत आहे. याठिकाणी काँग्रेस नेते अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
भंडारा गोंदियामध्ये 100 टक्के मतदान झालं. राष्ट्रवादी काँगेसचे राजेंद्र जैन, काँगेसचे प्रफुल अग्रवाल तर भाजपचे परिनय फुके यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. यासाठी भंडा-यातील 195 तर गोंदियातील 198 स्थानिक स्वराज्य संस्थेचे एकूण 393 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात चार ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आली होती.
यवतमाळमध्ये 98.63 टक्के मतदान झालं. निवडणुकीत काँग्रेसचे शंकर बडे भाजप-सेना युती आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेले तानाजी सावंत यांच्यात थेट लढत झाली. यासाठी जिल्ह्यातही 7 मतदान केंद्रांवर मतदान झालं. इथे 439 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
जळगावच्या जागेसाठी 99.25 टक्के मतदान झालं. मतदानासाठी जिल्ह्यात 7 ठिकाणी मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. भाजपचे चंदूलाल पटेल आणि अपक्ष विजय भास्कर पाटील यांच्यात ही चुरशीची लढत आहे. एकूण 549 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.. गिरीश महाजनांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम हे रिंगणात आहेत. आधी सोपी वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीसाठी कठीण झाली. त्यामुळे 22 तारखेला होणार्‍या मतमोजणीचा निकाल काय लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular