महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील रोटरी क्लब, इनरव्हील क्लब व पोलीस खाते यांनी उत्स्फूर्तपणे केलेले स्वागत, दाखविलेले अगत्य, आपुलकी निश्चितच आम्हाला, आमच्या वीर माता-भगिनींना प्रोत्साहन देणारे असून, आम्ही वीरमाता – भगिनी एकट्या नाही. आमच्या मागे महाबळेश्वर वासीयांसारखे सारे देश बांधव आहेत. याची प्रकर्षाने जाणीव होते आहे असे गौरोद्गार गडचिरोली येथील शहीद परिवार संघटनेच्या अध्यक्षा हेमलता वाघाडे यांनी काढले.
गडचिरोली येथे कर्तव्य बजावत असताना नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या वीर माता, पत्नी व कुटुंबीय महाराष्ट्र दर्शन सहलीअंतर्गत महाबळेश्वर येथे आले होते. त्यावेळी येथील रोटरी क्लब, इनरव्हील क्लब व पोलीस खाते यांच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. महाबळेश्वर येथील पोलीस अधिकारी विश्रामगृह येथे हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी स्वागतानंतर केलेल्या भाषणात शहीद परिवार संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती वाघाडे यांनी वरील उद्गार काढले. यावेळी महाबळेश्वर रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप रिंगे, सेक्रेटरी ब्रिजभूषण सिंग, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मुक्ता कोमटी, सपना आरोरा, महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने, महाबळेश्वरातील दिव्यांग उद्योजक भावेश भाटीया, नीता भाटीया, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अनंत कुमार कोमटी, प्रा.गणेश कोरे, रो.शिरीष गांधी, नितीन चौरासिया, डॉ.सुहास जंगम, इनर व्हिलच्या स्नेहल कोमटी, तृप्ती तोष्णीवाल, अश्विनी कोमटी, ज्योती पलोड, प्रा.अरुणा कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.गणेश कोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिरीष गांधी यांनी केले. यावेळी या परिवारासाठी जगलर शो, जादूचे प्रयोग, पपेट शो यांचे विरंगुळा म्हणून आयोजन केले होते तसेच अंधश्रद्धा निर्मुलन बाबत प्रात्यक्षिकासह व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.