वडूज : वडूज नगरपंचायतीच्या निवडणूकीत अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवसा अखेर एकूण 31 जणांनी माघार घेतली. प्रभाग 9 मधील चारपैकी 3 उमेदवारांनी माघार घेतल्याने या ठिकाणी छाया शशिकांत पाटोळे यांची बिनविरोध निवड झाली. अन्य 16 जागासाठी 75 जण निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
प्रभाग 9 मधून भाजपाच्या सुषमा दिपक बोडरे यांच्यासह अपक्ष पुष्पलता बनाजी पाटोळे, सिंधु बाळू पाटोळे या तीन महिलांनी माघार घेतल्याने माजी उपसरपंच शशिकांत पाटोळे यांच्या पत्नी छाया पाटोळे यांची बिनविरोध निवड झाली. माघार घेतलेल्या अन्य प्रमुख उमेदवारांमध्ये प्रभाग 7 मधील श्रीकांत उर्फ काका बनसोडे, विशाल महामुनी, प्रभाग 11 मधील अभय विठ्ठलराव देशमुख, प्रभाग 1 मधील अॅड. राहुल काळे, प्रभाग 17 मधील राहुल उर्फ रावसाहेब गोडसे, विशाल गोडसे, नितीन गोडसे, प्रभाग 6 मधील प्रा. अजय शेटे, धनाजी काळे, श्रीकांत तोडकर, प्रभाग 2 मधील माजी उपसरपंच मोहन काळे यांच्या पत्नी मिनल काळे, वनिता बापूराव ननावरे, मनिषा मनोज बनकर, प्रभाग 13 मधील सुरेखा हणमंत गोडसे, नलिनी अनिल गोडसे, तैय्यबा सज्जाद शेख, प्रभाग 16 मधील माधवी गणेश गोडसे, प्रभाग 3 मधील मनिषा अविनाश खुडे, प्रभाग 4 मधील संध्या संजय अंबिके, सौ. कुंभार आदिंचा समावेश आहे. अर्ज माघारीमुळे प्रभाग 14 मध्ये काँग्रेसचे अशोकराव गोडसे विरुध्द भाजपाचे वचनशेठ शहा अशी दुरंगी, प्रभाग 7 मध्ये काँग्रेसचे डॉ. महेश गुरव, राष्ट्रवादीचे विजय काळे व अपक्ष सचिन काळे, प्रभाग 15 मध्ये राष्ट्रवादीच्या शोभा सचिन माळी, काँग्रेसच्या मंदा बनसोडे, भाजपच्या रेखा बनसोडे अशी तिरंगी तर अन्य प्रभागात बहुरंगी लढती होणार आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीत बंडखोरी तर
महाआघाडीत दोन ठिकाणी मैत्रीपुर्ण लढत
प्रभाग 10 मध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमोलशेठ गोडसे आहेत. याठिकाणी पक्षाचे विपुल पोपटराव गोडसे यांचाही अर्ज निवडणूक रिंगणात राहिला आहे. प्रभाग 6 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार अशोकराव गाढवे यांच्या विरोधात विजय पांडुरंग शेटे व विजय उर्फ बापू शेटे यांनी तर प्रभाग 7 मध्ये विजय काळे यांच्या विरोधात सचिन प्रतापराव काळे यांनी बंडखोरी करत दंड थोपटले आहेत. प्रभाग 10 मध्ये भाजपाच्या चिन्हावर रिपाईचे तालुका अध्यक्ष राजेंद्र जगताप लढत आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे संजय खुस्पेही रिंगणात राहिले आहेत. प्रभाग 5 मध्येही भाजपा-शिवसेनेचे सागर रायबोळे, निलेश रायबोळे हे मैदानात उतरल्याने या दोन प्रभागात मैत्रीपुर्ण लढत होणार आहे.
रामोशी समाजात एकी तर
धनगर, वडार समाजामध्ये बेकी
प्रभाग 9 मधील रामोशी समाजाची बैठक होवून त्यांनी 4 पैकी एकास संधी देवून निवडणूक बिनविरोध करत एकी दाखवून दिली. तर प्रभाग 2 मध्ये धनगर समाजाचे पाच उमेदवार, प्रभाग 8 मध्ये वडार समाजातील चार महिला निवडणूक रिंगणात उतर्लया आहेत. याच प्रभागात नाभिक समाजाच्या दोन महिला निवडणूक रिंगणात आहेत.