वडूज : खटाव-माण या दोन दुष्काळी तालुक्यांना कायमस्वरुपी वरदान ठरणार्या जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेसंदर्भात राज्यशासनाने अध्यादेश काढल्याने मनस्वी समाधान झाल्याचे मत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा शिवसेना नेते रणजितसिंह देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे 1997 साली तत्कालीन युती शासनाने मंजूर केलेली जिहे-कठापूर योजना काँग्रेस आघाडी शासनाच्या कालावधीत निधी अभावी रेंगाळत पडली होती. ही योजना सुर व्हावी याकरीता आपण व आपल्या समर्थक कार्यकत्यांनी वेळोवेळी मोर्चा, रास्तारोको, उपोषण आंदोलन केले होते. सातारा येथील कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यालयावर काढलेल्या मोर्चाप्रसंगी आपल्यासह कार्यकत्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यानंतर दोन वर्षापूर्वी केंद्रात व राज्यात सत्तांतर झाले. सत्ता बदलल्यानंतर शेती पाणी प्रश्नाचा बारकाईने अभ्यास असणारे तसेच खटाव माणसह आपला व्यक्तीगत स्नेह असणारे विजयबापू शिवतारे यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली. त्यानंतर या प्रश्नासंदर्भात आपण त्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. वडूज, निमसोड येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठमोठे जाहिर मेळावे घेवून त्यांना शेती-पाणी प्रश्न सोडविण्याची निकडीची गरज जनतेच्या साक्षीने पटवून सांगितली. शिवतारे बापूंनीही या योजनेसंदर्भात तळमळीने प्रयत्न करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन यांना योजनेचे महत्व पटवून सांगितले. त्यांनीही पालकमंत्र्यांचा आग्रह व योजनेची भौतिक परस्थिती, जनतेची गरज या गोष्टी लक्षात घेवून योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून दिली.
सुप्रोमा मंजूर झाल्यामुळे या योजनेस सुमारे 1 हजार कोटीचा निधी मिळणार आहे. यातील 102.53 कोटी निधी पहिल्या टप्यात मिळणार आहे. त्यामध्ये कृष्णा नदीवरील बॅरेज, तीन पंपगृह, उर्ध्वगामी नलिकेचे एका रांगेचे काम आदी कामे होणार आहेत. ही कामे लवकरात लवकर सुरु करावीत या मागणीसाठी आपण शिवसेना पदाधिकारी, कार्यकत्यांच्या माध्यमातून कायम पाठपुरावा करणार आहोत. असे नमूद करण्याबरोबर श्री. देशमुख यांनी पत्रकाद्वारे मुख्यमंत्री श्री. फडणवीस व पालकमंत्री शिवतारे यांचे खटाव-माणच्या जनतेच्या वतीने पत्रकाद्वारे अभिनंदन केले आहे.
जिहे-कठापूरचा अध्यादेश निघाल्याने मनस्वी समाधान : रणजितसिंह देशमुख
RELATED ARTICLES