पत्रकार परिषदेत शेखर चरेगांवकर यांची माहिती
कराड : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा एकूण 6 प्रभागामध्ये स्वबळावर लढेल तर उर्वरित प्रभागात नगरसेवक महादेवराव पवार यांच्या आघाडी बरोबर भाजपाचा हातात हात असेल. विकासाच्या मुद्यावर व पक्ष चिन्हावर आम्ही या निवडणुकीस सामोरे जाण्याचा निर्धार केला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी आज येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भाजपा प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोलसे, भाजपाचे प्रदेश सदस्य भरत पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहर अध्यक्ष एकनाथ बागडी तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
चरेगांवकर म्हणाले, शहरात रस्ते, विज, पाण्यासह अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. या पाच वर्षात सत्ताधार्यांनी काय कामे केली. यावर टिकाटिपण्णी करण्यापेक्षा जनतेनेच आता याला उत्तर दयायचे ठरवले आहे असे शहराचा कानोसा घेतल्यास लक्षात येते. त्याकरिता भाजपा हाच पर्याय लोकांसमोर आहे. केंद्रातील व राज्यातील सत्तेत असलेल्या भाजपा सरकारच्या कामावर जनता समाधानी आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी भाजपाच्या उमेद्वारी व कार्याला जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. याचाच परिपाक म्हणून आज कराड न.पा. निवडणुकीसाठी मोठया प्रमाणात भाजपाची उमेद्वारी मिळवण्याकरिता मुलाखतींना भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय. आम्ही उमेद्वारी देताना चारित्र्य व उमेद्वाराचा समाज कार्याचा अनुभव पाहुनच उमेद्वारी निश्चित करीत आहोत.
महादेवरावांची आघाडी भाजपाच्या सोबत आहे मात्र माजी आ. विलासकाका तुमच्याबरोबर येणार का ? असे चरेगांवकर यांना विचारताच, आम्ही कोणत्याही राजकीय नेत्याशी स्वताहून बोलायला गेलो नाही, जाणारही नाही. आमच्या सोबत ज्यांना यायचे आहे त्यांच्याकरिता आमचे दरवाजे खुले आहेत. आम्ही शहरातील सहा प्रभागामध्ये फक्त भाजपाचे अधिकृत उमेदवार कमळ या पक्षचिन्हावर उभे करणार आहोत तर उर्वरित प्रभागामध्ये आमच्याबरोबर येणार्या आघाडीचा एक व आमचा अधिकृत एक असे उमेद्वार रिंगणात उतरवणार आहोत. भाजपाचा अधिकृत उमेद्वार नगराध्यक्ष पदासाठी जनतेतून पक्ष चिन्हावर उभा असेल असेही चरेगांवकर यांनी सांगितले.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, होणार्या पंचायत समिती व जि.प निवडणुकीमधून आमच्या व विलासकाकांच्या रयत सहकार पॅनेलच्या माध्यमातून आम्ही एकत्रित विरोधकांना सामोरे जावू मात्र सध्या होऊ घातलेल्या कराड न.पा. निवडणुकीमध्ये भाजपाच्या पक्ष चिन्हावर ही निवडणुक लढविण्यासाठी आम्ही पदाधिकारी कटिबद्ध आहोत याकरिता पक्षाची भुमिका पक्षचिन्हावरच या निवडणुकीकरिता आग्रही आहे. पक्षाचा राज्याचा चिटणीस म्हणून मीही या निवडणुकीमधुन पक्षचिन्हावर माझे उमेदवार उभे करण्याकरिता प्रयत्नशील आहे. येत्या 29 तारेखेला मी, चरेगांवकरसाहेब, व विक्रम पावसकर मिळून अंतिम उमेद्वारांबाबतची यादी जाहीर करू असेही अतुलबाबा यांनी शेवटी सांगितले.