कामगारांच्या संस्थांची वार्षिक सभा उत्साहात
भुईंज : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यातील कर्मचार्यांसाठी कार्यरत असलेल्या तिन्ही संस्था कामगारांसाठी उत्तमप्रकारे काम करीत असून या संस्थांच्या उत्कृष्ठ सेवेमुळे त्यांच्या अर्थकारणात मोठी वाढ झाली आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी केले. दरम्यान, त्रिपक्षीय समितीने शिफारस केलेली वेतनवाढ शासनाने मान्य केली असून कारखान्यातील सर्व कर्मचार्यांना त्यानुसार वेतनवाढ लागू करण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
कारखाना कार्यस्थळावरील किसन वीर साखर कामगार पतसंस्था,आबासाहेब वीर साखर कामगार पतसंस्था, कामगार कल्याण मंडळ या तीन संस्थांची संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभा मदनदादा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर व संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.
मदनदादा भोसले पुढे म्हणाले, कारखान्याच्या आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीत कारखान्याच्या अधिकारी व कर्मचार्यांचे मोलाचे योगदान राहिलेले आहे. कर्मचार्यांनी हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव ठेवून किसन वीर साखर कारखान्याच्या खडतर प्रवासात सहकार्य करावे. सध्या साखर उद्योग अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. अशा अडचणीच्या काळात अधिकारी व कर्मचार्यांनी त्याच उमेदीने संचालक मंडळास सहकार्य करून येणारा हंगाम यशस्वी करावा. यंदाचा हंगाम सर्वांचीच कसोटी पाहणारा आहे. संस्थेचे हित हेच आपले हित मानून कर्मचार्यांनी आपले वर्तन ठेवावे. यावेळी मदनदादा भोसले यांनी दोन्ही कामगार पतसंस्थांनी ऑलम्पिकमध्ये देशाचे नाव उज्ज्वल केलेल्या मुलींची दखल घेऊन आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याने कार्यक्षेत्रात केलेल्या जलसंधारण कामाची दखल घेऊन अहवाल सुंदर आणि सुबक केल्याचे नमुद केले.
गजानन बाबर म्हणाले, मातृसंस्थेचा कारभार निट चालल्यामुळे कामगारांच्या तिनही संस्था भक्कमपणे वाटचाल करीत आहेत. कामगारांनी कामगारांच्या संस्था आत्मियतेने, निकोप व पारदर्शकपणे चालवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करून श्री. बाबर यांनी तिनही संस्थांच्या कामगाराभिमुख कारभाराचे कौतुक केले.
नारायण चुनाडे, मदन चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. किसन वीर पतसंस्थेच्या अध्यक्षा शिला जाधव-शिंदे, आबासाहेब वीर पतसंस्थेचे अध्यक्ष उत्तम तळेकर व कामगार कल्याण मंडळाचे कार्याध्यक्ष सचिन वाघमळे यांनी संस्थेच्या अहवाल सालातील कामकाजाची माहिती दिली. तिनही संस्थांच्या विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सन 2016-17 साठी कामगार कल्याण मंडळाच्या सदस्यांची नावे जाहीर करण्यात येऊन मंडळाच्या अध्यक्षपदी सागर वनारसे यांची निवड करण्यात आली. मदनदादा भोसले, वाई अर्बन बँकेच्या चेअरमनपदी कारखान्याचे संचालक सीए सी. व्ही. काळे व ओम दत्त चैतन्य बँकेच्या चेअरमनपदी रतनसिंह शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार यावेळी तिन्ही संस्थांच्यावतीने करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचार्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
किसन वीरच्या कामगारांच्या तिन्ही संस्थांचे काम उत्तम : मदन भोसले
RELATED ARTICLES