सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्यावतीने महा अवयवदान रॅलीचा शुभारंभ आज सकाळी करण्यात आला जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानासाठी पुढे येवून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी.पाटील, जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ.दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीकांत भोई, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.उज्वला माने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश पाटील, डॉ.विजया जगताप आदी उपस्थित होते.
उपाध्यक्ष श्री.साळुंखे पुढे म्हणाले, अवयवदान ही काळाची गरज असून आज देशात अवयव गरजू रुग्णांची प्रतीक्षा यादी ही मोठया प्रमाणात वाढत आहे. या रॅलीच्या माध्यमातून अवयवदानाबाबत जागृती होण्यास निश्चित मदत होईल. अवयव दान केल्याने रुग्णाचा जीव वाचू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानासाठी पुढे यावे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भोई पुढे म्हणाले, अवयवदान हे इतरांच्या आयुष्यातील एक आशेचा किरण ठरु शकतो. मृत्यू पश्चात एक देह सात जणांच्या आयुष्याचा दर्जा सुधारु शकतो. अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षानुवर्षे प्रतीक्षेत आहेत. ही प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी नागरिकांनी पुढे येवून अवयवदान करावे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यंकटेश गौर यांनी केले.
मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीस सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी आरबीएसके कार्यक्रमांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे प्रमुख हेमंत भोसले आर्यंगल महाविद्यालय, सावकार होमिओपॅथिक महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सोशल वर्क, शासकीय नर्सिग कॉलेजचे अध्यापक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.पोलिस करमणुक केंद्र येथे या रॅलीची सांगता झाली.
महा अवयवदान रॅलीच्या माध्यमातून अवयवदानाबाबत जागृती
RELATED ARTICLES