अज्ञाताविरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल
शिवनगर: उत्कृष्टरित्या सुरू असलेल्या य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजात काही अज्ञातांकडून जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न आज सकाळी उघडकीस आला. कारखान्याच्या केन कॅरिअरमध्ये 2 फूट लांबीचा आणि 10 किलो वजनाचा लोखंडी रॉड टाकून कामकाज बंद पाडण्याचे गैरकृत्य करण्याचा प्रयत्न काही अज्ञातांनी केला. पण तातडीने मिल बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल संचालक मंडळाने घेतली असून, दोषींना पकडण्यासाठी कारखान्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, संशयितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
कृष्णा सहकारी साखर कारख्यान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाला नुकताच प्रारंभ झाला आहे. कारखान्याचे कामकाज योग्य व सुरळीतपणे सुरू असतानाच आज सकाळी 8.35 वाजण्याच्या सुमारास शिफ्ट सुपरवायझर अधिक पाटील यांना मशिनमध्ये आवाज झाल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांनी गव्हाणीत पाहिले असता त्यांना केन कॅरिअरमध्ये 2 फूट लांबीचा व 10 किलो वजनाचा लोखंडी रॉड टाकला असल्याचे आढळून आले. याची गंभीर दखल घेत तातडीने मिल बंद करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, गेल्यावर्षीही काही अज्ञातांकडून कारखान्याचे कामकाज बंद पाडण्याचा प्रकार घडला होता. त्याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. यंदाही हाच प्रकार घडल्याने याविरोधात कडक पावले उचलत कारखाना प्रशासनाने दोषींना पकडण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास प्रारंभ केला आहेत. तसेच कायदेशीर कारवाईबाबतही कडक पावले उचलत कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात कारखाना प्रशासनामार्फत संशयिताविरूद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.