सातारा : कोणताही ठोस मुद्या नसल्याने विरोधक खोटेनाटे आणि बिनबुडाचे आरोप करुन मतदारांना भुलवू पहात आहेत. सातारा शहराच्या विकासासाठी विविध योजना कोणी आणल्या? विविध कामांसाठी भरीव निधी कोणी आणला? हे सातारकर नागरिकांना माहित आहे. नगरविकास आघाडीने नागरिकांच्या हिताशी कधीही तडजोड केली नाही. सातारा शहराचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी, शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी नागरिकांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता काठीला मत देवून विकासाला साथ द्यावी, असे आवाहन नविआचे नेते आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
बुधवारी सकाळी 7 वाजता नविआच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवार नाका, बारटक्के चौक, 501 पाटी, तेली खड्डा, नगाशपूरा, बसाप्पा पेठ, कोमठी चौक ते झेंडा चौक, इंदलकर आळी, कुंभारआळी, भैरवनाथ पटांगण ते भैरवनाथ मंदिर, विभूते पार, श्रीपतराव पाटील हायस्कूल, मेहेर देशमुख कॉलनी, बाबर कॉलनी, शेंडे गणपती मंदीर या मार्गावर पदयात्रा काढण्यात आली.
नविआचे उमेदवार सौ. वैशाली महामुने, शकील बागवान, बाळासाहेब भुजबळ, सौ. शैलजा किर्दत, सौ. संगिता धबधबे, सौ. अरुणा पोतदार यांच्यासह साविआच्या विद्यमान नगरसेविका सौ. माधुरी भोसले, भाग्यवंत कुंभार, अतुल चव्हाण, विकास देशमुख, अॅड. चंद्रकांत बेबले, जगन्नाथ किर्दत, श्रीरंग जाधव यांच्यासह नविआचे आजी, माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पदयात्रा मार्गावर ठिकठिकाणी आ. शिवेंद्रसिंहराजे आणि उमेदवारांचे औक्षण करुन आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. आ. शिवेंद्रसिंहराजे व उमेदवारांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत आपुलकीचा संवाद साधला आणि नगर विकास आघाडीची भुमिका समाजावून सांगितली. सातारा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी, शहराची प्रगती करण्यासाठी नगरविकास आघाडीला साथ द्या, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पदयात्रेदरम्यान नागरिकांना केले. सातारा शहराचा पुढील पाच वर्षात कायापालट करण्यासाठी नगरविकास आघाडी कटीबध्द आहे. एक आधुनिक व्हिजन घेवून नगरविकास आघाडी निवडणूक रिंगणात उतरली आहे. शहराचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी नगराध्यक्षपदावर एक सक्षम आणि कार्यक्षम महिला आवश्यक आहे. सौ. वेदांतिकाराजे यांच्यारुपाने पालिकेला एक कर्तव्यदक्ष आणि जनहित जोपासणारा नगराध्यक्ष मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आघाडीच्या काठीला म्हणजेच शहराच्या विकासाला मत देवून सौ. वेदांतिकाराजे यांच्यासह आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.
दरम्यान, सौ. वेदांतिकाराजे यांनी प्रभाग 20 मध्ये घर टू घर भेट देवून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आघाडीच्या उमेदवार सौ. लिना गोरे, महेश राजेमहाडीक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सौ. वेदांतिकाराजे यांनी प्रत्येक घरात जावून वडीलधार्यांचा आशिर्वाद घेतला आणि नगरविकास आघाडीची भुमिका स्पष्ट केली. नागरिकांनीही सौ. वेदांतिकाराजे यांचे उत्स्फुर्तपणे स्वागत करुन नगरविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.