सातारा : साहित्य क्षेत्रामध्ये भटक्या समाजाचे दु:ख शब्दबद्ध करुन त्यांचे जीवनमान जगासमोर आणणारे व बौद्ध धर्माची दिक्षा घेणारे साहित्यिक लक्ष्मण माने यांना महिला अत्याचार प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांच्या न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे पुरोगामी कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेली 35 ते 40 वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करणारे लक्ष्मण माने यांनी भटक्याविमुक्त जातीतील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जकातवाडी, ता. सातारा येथे अखिल भारतीय भटक्या विमुक्त जाती जमाती विकास व संशोधन संस्थेच्या माध्यमातून शिक्षण संस्था उभारली. या संस्थेतीलच चतुर्थश्रेणी वर्गात काम करणार्या सहा महिलांनी माने यांनी अत्याचार केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात 2013 साली दाखल केली. या तक्रारीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती. पुरोगामी कार्यकर्त्यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले. तर काहींनी मीडिया ट्रायल करुन माने यांच्या बदनामीची संधी सोडली नाही. या तीन वर्षाच्या कालावधीत न्यायालयावर विश्वास ठेऊन माने यांनी न्यायालयीन लढा लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावतीने ऍड. एम. पी. यादव यांनी भक्कमरित्या मांडणी केली तसेच बचावात्मकरित्या मुद्दे उपस्थित करुन न्यायालयाचे लक्ष वेधले.
न्यायालयाने देान्ही बाजू समजून घेऊन लक्ष्मण माने यांची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयामुळे भारतीय भटके विमुक्त शिक्षण संशोधन संस्थेमध्येआनंदोत्सव साजरा करण्यात आला. निकालानंतर अनेक मान्यवरांनी माने यांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबिय व कार्यकर्ते शेवटपर्यंत राहिले. तसेच न्यायालयाने योग्या निकाल दिल्याबद्दल माने यांनी आभार मानले.