जोशी विहीर : वाचनाचा संबंध हा व्यापक बदलाशी आहे. समाजामध्ये वाचन संस्कृती रूजवीत असताना पुस्तकाबाहेरचा समाजसुद्धा आपल्याला वाचता आला पाहिजे असे मत जेष्ठ विचारवंत अन्वर राजन यांनी मांडले. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मीती मंडळ, ग्रामपंचायत भुईंज, भुईंज मुस्लीम समाज व भुईंज पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने जामा मशिद प्रांगण भुईंज येथे वाचन प्रेरणा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते.
सदर मेळाव्याचे उद्यघाटन प्रा.सचिन गरूड कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय इस्लामपूर यांनी केले. अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रशीद बागवान होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्या राजनंदा जाधवराव, भुईंज ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब कांबळे, उपसरपंच अनुराधा भोसले, प्राचार्या संगिता जाधव शिंदे, प्राचार्य विजयकुमारमाने, डॉ.रशीदशेख, भैय्यासाहेब जाधव, जी.एस.कुचेकर इत्यादी मान्यवर उपस्थितीत होेते.यावेळी मार्गदर्शन करताना अन्वर राजन म्हणाले की, पुस्तकात लिहीलेले सगळेच खरे वा असत्य असेलच असे नाही. त्यासाठी पुस्तका बाहेरचा समाज वाचता आला पाहिजेत. ज्ञान व्यवहार मुक्तीच्या दिशेन नेत असताना व पुढच्या पिढीपर्यंत ज्ञान पोहचवीत असताना भाषा, धर्म, जात, लिंग यावर आधारित भेदभाव नष्ट करीत व्यापक बदलाला सामोरे जाण्याची गरज त्यांनी प्रतिपादली.
यावेळी अॅड.रशीद शेख, विशाल कांबळे(बार्टी), महाविद्यालयीन विद्यार्थी, प्रज्वल साबळे, ऐश्वर्या गायकवाड, निकीता जाधव, अनुष्का खरे, दिव्या मतकर यांनी वाचनसंस्कृती बद्दल आपली मते मांडली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकीचे वाचन होवून वाचन प्रेरणादिन मेळाव्याचे उद्यघाटन झाले. पाहुण्यांना व अधिकारी यांना पुष्पगुच्छ, हारतुरे या प्रथेला फाटा देत. पुस्तके देवून पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक व सुत्र संचालन सरपंच बाळासाहेब कांबळे यांनी केले. यावेळी मेळाव्यास मोठया संख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थितीत होते.