सातारा, दि.21 (जिमाका) : महाराजस्व अभियान हे सर्वसामान्य जनता तसेच वंचतीसांसाठी विशेष योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महसूल प्रशासन या कार्यक्रमाचे आयोजन करते. या माध्यमातून शासन हे सर्वसामान्यांच्या हिताच्या आणि समाज विकासाच्या गोष्टी त्यांच्या गावात येवून सांगण्याचा व त्यांना थेट लाभ देण्याचा हा एक अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले.
मेढा येथे महाराजस्व अभियनांतर्गत विविध दाखल्यांचे वाटप जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील, तहसीलदार रोहिणी आखाडे, गटविकास अधिकारी सतीश गुद्दे आदी उपस्थित होते.
सर्व सामान्य जनतेला विविध दाखले सुलभ पद्धतीने मिळावे यासाठी महसूल प्रशासनाचा नेहमीच प्रयत्न असतो. यापुढे महाराजस्व अभियान सर्कल निहाय राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे सुयोग्य नियोजन करण्याचे कामकाज सुरु असल्याचे सांगून जावली तालुक्यातील जो पुनर्वसनाचा महत्वाचा प्रश्न आहे तो लवकरच मार्गी लावू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
जावली तालुक्यातील पाणंद रस्ते मोठ्या प्रमाणात खुले करण्यात आले ही कौतुकाची बाब आहे. यापुढेही मोठ्या प्रमाणात पाणंद रस्ते खुले करा. 7/12 संगणकीकरणाचे काम लवकरात लवकर 100 टक्के पूर्ण करण्यात येणार आहे. 7/12 चे काम हे अत्यंत अचूक पद्धतीने करण्यात येत आहे. चुका होणार नाहीत याची दक्षता घेण्यात येत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जावली तालुक्यात महसूल विभागामार्फत घेण्यात आलेल्या दि.21 नोव्हेंबर 2017 रोजीचे महाराजस्व अभियानांतर्गत सर्व कार्यालयांमार्फत लोकाभिमुख घटक कामकाज झालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे. सेतु विभाग जातीचे दाखले- 228, डोंगरी दाखले-658, डोमासाईल दाखले-312, उत्पन्नाचे दाखले 343 एकूण 1 हजार 541. पुरवठा विभाग विभक्त रेशनकार्ड-112, नाव वाढविणे-169, नाव कमी करणे-82, दुबार रेशनकार्ड – 565, नवीन रेशनकार्ड 15 एकूण 943. संजय गांधी योजना शाखा – राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना 1 लाभार्थी रुपये 20 हजार चेक वाटप. संजय गांधी योजना 17 लाभार्थी मंजुरीचे प्रमाणपत्र व फॉर्म वाटप 50. तसेच वनक्षेत्रपाल मेढा यांच्या कार्यालयाकडून महाराजस्व अभियानांतर्गत अनुसूचित जातीच्या एकूण 19 लाभार्थ्यांना नवीन एलपीजी गॅस कनेक्शन चे वाटप करण्यात आले.