सातारा : कोपर्डी घटना व शहिद पोलीस विलास शिंदे यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा निंदणीय आहे. तसेच गेले कित्येक दिवस मराठा समाज आरक्षणाची मागणी करत असून मराठा व ब्राम्हण समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे अशी मागणी आरपीआय ब्ल्यू फोर्स व श्रमीक ब्रिगेड संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन केली.
हे आंदोलन आरपीआय जिल्हा नेते दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, उपाध्यक्ष संजय गाडे, ब्ल्यू फोर्सचे मदन खंकाळ, अजित नलवडे, किरण बगाडे, संतोष ओव्हाळ, गणेश भोसले, सिध्दार्थ गायकवाड व कार्यकर्ते व महिला सामील होत्या.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , आजही मराठा समाजातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. प्रस्थापितांकडूनच मराठा समाजाती गळचेपी होत आहे. कोपर्डी प्रकरण हे राजकीय स्वार्थ साधण्याच्या हेतूने मराठा व अनुसूचित जाती व जमातीत तेढ निर्माण करण्यासाठी अॅट्रासीटीचे भांडवल केले जात आहे. याचा निषेध करत अॅट्रासिटीचा कायदा कडक करावा. मराठा व ब्राम्हण समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे तसेच शहिद पोलीस विलास शिंदे व कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभर ना. आठवले व महाराष्ठ प्रदेश अध्यक्ष महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.