सातारा पालिकेला नगरोत्थानमधून अडीच कोटीचा निधी
सातारा : सातारा शहराचा विकास गतीने सुरु असून आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वेळोवेळी केंद्र आणि राज्य शासनाकडून कोट्यवधींचा निधी आणून सातारा शहरातील रस्ते चकाचक केले आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून आताही नगरोत्थानमधून पालिकेला अडीच कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती पालिकेचे उपनगराध्यक्ष जयवंत भोसले यांनी दिली. दरम्यान, कराड ब वर्ग नगरपालिका असताना देखील राज्य सरकारने 7 कोटी निधी दिला असून जिल्ह्याचे ठिकाण आणि अ वर्ग नगरपालिका असलेल्या सातारा पालिकेला मात्र 4.5 कोटी निधी देवून दुजाभाव केला आहे. अंतिम टप्प्यात असलेला हद्दवाढीचा प्रस्ताव सातार्यातीलच भाजपा नेत्यांमुळे बारगळा असून स्वत:चे सरकार असूनही भाजपाच्या नेत्यांना सातार्यासाठी भरिव निधी उपलब्ध करता येत नाही, याचे आश्चर्य वाटते, असा टोला उपनगराध्यक्ष जयवंत भोसले यांनी लगावला आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे बहुतांश सर्वच शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्या तुलनेत सातारा शहरातील रस्त्यांची कामे दर्जेदार झाल्याने रस्ते चांगल्या स्थितीत आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विशेष प्रयत्न करुन केंद्र आणि राज्य शासनाकडून सातारा शहरातील रस्त्यांसाठी वेळोवेळी भरिव निधी आणला. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळातील आणि कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे मार्गी लागली आहेत. कामे दर्जेदार झाल्याने नुकत्याच झालेल्या जोरदार पावसानंतरही रस्ते चांगले टिकले आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून नगरोत्थानमधून अडीच कोटीचा निधी पालिकेला मिळाला असून शहरातील उर्वरीत रस्त्यांची कामेही लवकरच मार्गी लागणार आहेत. शहरातील रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळेच शहरातच्या प्रत्येक भागात डांबरी रस्ते पहावयास मिळत आहेत.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी हद्दवाढीसाठी पाठपुरावा केल्याने प्रस्ताव मंजुरी अंतीम टप्प्यात आली होती. मात्र अखेच्या क्षणी सातार्यातीलच भाजपच्या पदाधिकार्यांनी हद्दवाढीमुळे आपल्याला काहीही फायदा होणार नाही, हद्दवाढीचा प्रस्ताव बाजूला ठेवा असे सांगून मुख्यमंत्र्यांना सदर प्रस्ताव मंजूर करण्यापासून परावृत्त केल्याचे ऐकायला मिळत आहे. सातार्यातील भाजपावाल्यांमुळेच हद्दवाढीचा प्रस्ताव लांबणीवर पडला आणि गतीमान विकासाला खिळ बसली असल्याचा घणाघाती आरोप जयवंत भोसले यांनी केला आहे. निवडणूकीपुरत्या फुशारक्या न मारता राज्य आणि केंद्रातील सत्तेचा फायदा भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी शहराच्या विकासासाठी करणे अपेक्षित होते. मात्र सातारा पालिकेपेक्षा कराडला जादा निधी दिला गेल्याने सातार्यातील भाजपा पदाधिकार्यांची ताकद कमी पडली, असे दुर्देवाने म्हणावे लागत आहे. अडीच वर्षानंतर का होईना 4.5 कोटी निधीची तरतूद सातारा पालिकेसाठी युती सरकारने केली आहे. निधी कोणी दिला हे महत्चावे नाही तर, मिळणार्या निधीचा विनियोग शहराच्या विकासासाठी करणे हे पालिकेचे कर्तव्य असून त्यात कधीही कसूर झालेली नाही, असेही भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे