पंचवीस लाख मोर्चेकरी अपेक्षित धरुन नियोजनास प्रारंभ : मोर्चेकर्यांच्या सेवेला तीन हजार स्वयंसेवक
सातारा : कोपर्डी बलात्कार प्रकरण, मराठा आरक्षण, अट्रॉसिटी कायद्यातील दुरुस्ती यांसह विविध मागण्यांसाठी सातार्यात दि. 3 ऑक्टोंबर रोजी सकल मराठा समाजाच्यावतीने काढण्यात येणार्या मराठा क्रांती मोर्चात सुमारे 25 लाखाहून अधिक मराठा समाजबांधव सहभागी होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरु केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी याबाबतचा मोर्चा मार्गही निश्चित करण्यात आला. पोलिस व्यवस्था, आरोग्यविषयक सुविधा, टोलमुक्ती, वाहतूक व्यवस्था आदि उपाययोजनांचा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल तसेच जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी आढावा घेवून सकल मराठा समाज समितीच्या सूचनांवर चर्चा केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अश्विन मुदगल तसेच जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील आदि अधिकार्यांच्या प्रमुख उपस्थितीत सकल मराठा समाजाची बैठक झाली. त्यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल म्हणाले, सातारा शहरातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होणारी जागा मोर्चेकर्यांसाठी अपुरी आहे त्यामुळे पोवईनाक्यावर आठ रस्ते एकत्र येत असून अंतर्गत रस्त्यांचाही वापर करण्यात येणार असल्याने मोर्चासाठी जास्तीत जास्त जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. विविध शहरांच्या दिशेने मोर्चात सहभागी होणार्या लोकांना अतिरिक्त जागा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. बहुसंख्य लोक वाहनाने येणार असल्याने वाहतूक व्यवस्थाही करण्यात येत आहे. त्यांच्यासाठी ज्या-त्या ठिकाणी पार्किंग उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याशिवाय शहरातील जिल्हा परिषद मैदान, सैनिक स्कूल मैदान, पोलिस परेड ग्राऊंड, कोटेश्वर मैदान, जिल्हा क्रीडा संकुल, गांधी मैदान, तालीम संघ मैदान इत्यादी मैदाने मोकळी करण्यात येत आहेत. मोर्चात लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होणार असल्याने मोबाईल नेटवर्कची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे वॉकीटॉकीचा वापर केला जाणार आहे. मोर्चावेळी वैद्यकीय सेवा जलदगतीने मिळावी यासाठी आरोग्य विभागाकडून 10 अॅम्बुलन्स, 10 वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतील. याशिवाय जिल्हा रुग्णालयात 20 बेडचा एक वॉर्ड आणि सातारा शहरातील प्रत्येक रुग्णालयात मोर्चेकर्यांसाठी 5 बेड राखीव असतील. याशिवाय आवश्यक त्या ठिकाणी अग्निशमन दलाची व्यवस्था केली जाणार आहे. मोर्चा मार्गावर उघडे असलेले ट्रान्सफॉर्मर झाकणे आणि नादुरुस्त असलेल्या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करण्यात येणार असून दक्षतेचा उपाय म्हणून संबंधित प्रत्येक ठिकाणी एका व्यक्तीची नेमणूक करण्याच्या सुचना महावितरणला करण्यात आल्या आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी खासगी सुरक्षा रक्षकांऐवजी पोलिसांची अतिरिक्त कुमक दिली जाईल. मोर्चात आचारसंहितेचे उल्लंघन होवू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. शिवराज पेट्रोलपंपाजवळचा शहरात येणार मार्ग खुला केला जाईल. शिवाय तिथला स्पीड ब्रेकर काढून महामार्गावरील 2 लेन मोर्चासाठी उपलब्ध करुन दिल्या जातील. अवजड वाहतूक बंद की सुरु ठेवायची यासंदर्भात जिल्हा वाहतूक शाखा निर्णय घेईल. फलटण भागातून येणार्या वाहनांसाठी आरळे पुलावरुन वाहतुकीस परवानगी देण्यासंदर्भात बांधकाम विभागाचा अभिप्राय घेतला जाईल. मोर्चात सहभागी होणार्या लोकांनी ठरवून दिलेल्या मार्गानुसार बाहेर पडावे. वाहनचालकांनी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करु नये. मागण्यांसंदर्भात देण्यात येणार्या निवेदनाचे वाचन करण्यात येणार असल्याने ते मोर्चातील सर्वांपर्यंत पोहोचेल, अशी व्यवस्था समितीने करावी. छत्रपतींच्या राजधानीत मराठा समाजाचा मोर्चा निघत असल्याने याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावल्या जातील. काही अडचण असल्यास कधीही संपर्क साधा, असे आवाहनही जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले.
जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील म्हणाले, तालुक्या-तालुक्यातून मोर्चे निघणार असल्यामुळे प्रत्येक पोलिस स्टेशनला तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे संबंधित तालुक्यातील समितीच्या सदस्यांनी स्थानिक प्रशासनाला तयारीची माहिती द्यावी. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येणार असल्याने प्रत्येकजण मोर्चात सर्वात पुढे येण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. मात्र, सातार्यात आलेले मोर्चे ठिकठिकाणाहून पोवईनाक्यावर एकत्र येणार आहेत. त्यामुळे मोर्चात सर्वात पुढे महिला असतील. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणार्या रस्त्यांवर महिलांचे मोर्चे सर्वात पुढे असतील. असे केल्याने मोर्चात सहभागी होणार्या महिलांनाही बाहेर पडणे शक्य होईल. आरळे पूल वाहतुकीसाठी खुला केला तर वाढे फाट्यावर महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने प्रशासनाला सहकार्य करावे. एखादे वाहन नादुरुस्त होवून वाहतुकीचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी क्रेनची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. लोकांच्या माहितीसाठी पार्किंग झोन, मोर्चा मार्ग इत्यादीसंबंधी फ्लेक्स बोड आवश्यक त्याठिकाणी लावावेत. मोर्चा शांतते पार पडावा यासाठी वादग्रस्त मेसेज कुणीही पुढे पाठवू नयेत. शांततेचा भंग होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी,असेही संदीप पाटील यांनी सांगितले. सुमारे 25 लाख मोर्चेकर्यांचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाच्यावतीने शेवटी स्पष्ट करण्यात आले.
सकल मराठा समाज समितीमधील सदस्यांनीही मराठा क्रांती मोर्चाच्या पूर्वी तयारीची माहिती महसूल व पोलिस प्रशासनासमोर मांडली. मोर्चात मराठा समाजातील सर्वसामान्य लोक सहभागी होणार असून हा मूकमोर्चा आहे. त्यामुळे कुठलाही नेता भाषण करणार नाही.मराठा समाजातील सर्वच लोकप्रतिनिधी मोर्चात सामील होतील. मात्र ते सामान्य मराठा म्हणून मोर्चात सहभागी होतील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सहभागी होणार्या लोकांची गैरसोय होवू नये यासाठी मोर्चामार्गावर 2 हजार 500 स्वयंसेवक असतील. तर पार्किंगच्या ठिकाणी 500 स्वयंसेवक पुरवले जातील. त्यांना स्वतंत्र डे्रसकोड व आयडेंटी दिली जाणार आहे. शिवाय त्यांना या मोर्चाच्या अनुषंगाने प्रशिक्षणही दिले जाईल. या स्वयंसेवकांची संपूर्ण माहिती समितीकडे असेल. सहभागी मोर्चेकर्यांनी मोबाईल आणू नयेत असे आवाहन केले जाईलच, परंतु, तरीही मोबाईल आणले तरी ते सातार्यात आल्यावर बंद करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मोर्चात फक्त माहितीसाठी तसेच संपर्कासाठी स्वयंसेवाकांकडेच मोबाईल राहतील. मोर्चामार्गावर महिलांसाठी फिरती शौचालयगृहांची व्यवस्था प्रशासनाने करावी. फलटणकडून येणार्या लोकांसाठी आरळे पूल खुला करावा, मोर्चात सहभागी होणार्या लोकांसाठी टोलनाके खुले करावेत. इतर लोकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. ब्लडबँकानाही सूचना कराव्यात, अशा मागण्या यावेळी बैठकीत करण्यात आल्या. याबाबत सकारात्मक निर्णय घेतले जातील, असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. मोर्चाच्यावतीने पाच मराठा कन्यातर्फे मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाकडून देण्यात येणार आहे. या निवेदनाचे वाचन स्पीकरवरुन केले जाणार आहे. जिल्हाधिकार्यांना देण्यात येणार्या निवेदनाची माहिती मोर्चातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या स्क्रीन ठिकठिकाणी उभारण्यात येणार असून मोर्चाचे छायाचित्रीकरण ड्रोन कॅमेर्यांच्या माध्यमातून केले जाणार आहे.हा मोर्चा केवळ मराठा समाजाचा असल्याने मोर्चेकरी भगवा झेंडा घेवून सहभागी होणार आहेत. त्यामुळे इतर झेंडे मोर्चात दिसणार नाहीत. जागा मिळेल त्या मोकळ्या ठिकाणी पाणी वाटपाचे स्टॉल लावले जातील. स्वच्छतेची जबाबदारी नगरपालिकेसह स्वयंसेवी संस्था घेणार आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, सातार्याच्या प्रांताधिकारी स्वाती देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव धरणे, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलिस निरीक्षक नाळे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, पोलिस निरीक्षक रवींद्र पिसाळ यासह पोलिस अधिकारी व विविध खात्यांचे खाते प्रमुख उपस्थित होते.
मोर्चामार्ग व नकाशा व्हॉट्सअप व माध्यमांतून प्रकाशित होणार
सकल मराठा समाज व जिल्हा प्रशासनाने मोर्चा मार्ग व पार्किंग स्थळे बारकाईने टिपली आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत याबाबतची निश्चिती झाली आहे. हा मोर्चा मार्ग व पार्किंग स्थळे याबाबतची विश्लेषणात्मक टिपणी तयार करुन प्रिटिंग करण्याचे काम सुरु झाले आहे. दोन दिवसांत व्हॉट्सअप व वृत्तपत्रांतून समितीच्या मार्फत अधिकृत मोर्चामार्ग व नकाशा प्रकाशित केला जाणार आहे. यापूर्वी जे मेसेज फिरले ते दुर्लक्षित करुन समितीमार्फत देण्यात येणारा नकाशा अधिकृत समजून त्या-त्या तालुक्यांनी मोर्चाला येण्याचे नियोजन करायचे आहे, असेही यावेळी ठरले.
मराठा क्रांती मोर्चा टोलमुक्त , महामार्गावरील 2 लेन राखीव करणार , मोर्चा मार्ग, पार्किंग तळ निश्चित ,जिल्हा रुग्णालय व सातार्यातील हॉस्पिटल्समध्ये राखीव बेड ,10 अॅम्ब्यूलन्स, वैद्यकीय अधिकार्यांची टीम , ड्रोन कॅमेर्याद्वारे छायाचित्रीकरण , मोर्चाच्या शिस्तीसाठी वॉकीटॉकी यंत्रणा