एक मराठा… लाख मराठा, जय भवानी…
जय शिवाजी… घोषणांनी सातारा दुमदुमला
सातारा : एक मराठा… लाख मराठा…, जय भवानी… जय शिवाजी…, छत्रपती शिवाजी महाराज की जय..या घोषणांनी बुधवारी सकाळी सातारा दुमदुमले. निमित्त होते… मराठा क्रांती मोर्चाच्या सातारा जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनाचे. पाचशेहून अधिक मराठा बांधवांच्या उपस्थितीत आणि पाच कन्यांच्या हस्ते झालेल्या कार्यालयाच्या उद्घाटनामुळे मराठा बांधवांमध्ये चैतन्य होते. उद्घाटनानंतर फटाक्यांची आतषबाजीही झाली.
परभणी, बीड, उस्मानाबाद येथील मराठा क्रांती मूक मोर्चानंतर सातारा येथेही मराठा क्रांती मोर्चाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. येथील क्रांती मोर्चा दि. 3 ऑक्टोबर रोजी निघणार आहे. त्याच्या तयारीसाठी संपूर्ण जिल्हाभरात मराठी बांधवांनी रान पेटविले आहे. तालुक्याच्या ठिकाणी दररोज बैठकांवर बैठका होत असल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाची ज्योत पेटू लागली आहे. मात्र, तालुक्यातील मराठा बांधवांना आणि युवक, युवतींना जिल्हा समितीशी संपर्क साधता यावा म्हणून सातारा येथे मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा कार्यालय सुरु करण्यात आले आहे. सातारा बसस्थानक परिसरात असणार्या सेव्हन स्टार कॉम्पलेक्समध्ये बुधवारी सकाळी त्याचे उद्घाटन झाले. यावेळी पाचशेहून अधिक मराठा बांधव उपस्थित होते. विशेष म्हणजे भगिनींचाही सहभाग लक्षणीय होता.
एक मराठा… लाख मराठा…, जय भवानी… जय शिवाजी…, छत्रपती शिवाजी महाराज की जय… या घोषणांनी सातारा बसस्थानक परिसर दुमदुमला होता. प्रत्येक मराठी बांधव अगदी आवेशपूर्ण जोशात घोषणा देत होता.
कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. कार्यालयामध्ये मराठा क्रांती मोर्चासाठी तयार करण्यात येत असलेल्या समितीमध्ये काम करण्यास इच्छूक असणाजयांसाठी येथे आवाहन करण्यात आल्यानंतर अनेकांनी आपली नावे नोंदवली आहेत.
मी मराठा आहे आणि मी मराठ्यांसाठी लढतोय, अशी साद घालतच अनेक मान्यवरांनी आपली मते मांडली. मोर्चादिवशी सारे मिळून रान पेटवा आणि घरातील प्रत्येक व्यक्ती मोर्चात कशी सहभागी होईल, याबाबत सतर्क राहण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली. मोर्चाला गालबोट लागेल, असे कृत्य कोणीही करायचे नाही. दरम्यान, कराड येथे गेल्या चार-पाच दिवसांत जवळपास पाच लाख पत्रके वाटण्यात आल्याची माहिती दिल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. याचवेळी ज्या दिवशी मोर्चा आहे, त्यादिवशी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकार्यांकडे करण्यात यावी, अशी सूचना मांडण्यात आली. त्यासही एकमुखी मान्यता देण्यात आली.
जबाबदारी घेण्यासाठी स्पर्धा..!
मराठा क्रांती मोर्चामध्ये प्रत्येकजण आपल्याला जबाबदारी मिळावी म्हणून पुढे सरसावला आहे. येथे कोणी नेता नाही आणि कोणताही पक्ष नाही. मराठी बांधव हाच मराठा क्रांती मोर्चामध्ये मुख्य घटक आहे, त्यामुळे एक मराठा… लाख मराठा…ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक मराठी बांधव पुढे आला आहे. बुधवारी कार्यालयाचे उद्घाटन ज्यावेळी झाले, त्यानंतर जबाबदारीविषयी चर्चा झाली तर प्रत्येकजण पुढे आला. कोणी पाण्याची जबाबदारी घ्यायला तयार झाले तर कोणी पत्रके छापण्यासाठी पुढे आले. कोणी कार्यालयामध्ये 24 तास थांबवण्याची तयारी दर्शविली तर कोण म्हणते आम्ही काय करायचे तेवढे फक्त सांगा… असेच अभिमानाने सांगत होते. विशेष म्हणजे आम्ही हे आमच्या मराठा बांधवांसाठी करतोय आणि आम्हाला त्याच अभिमान आहे. मात्र, आम्ही मदत करतोय याचे साधे नावही कोठे नको आणि त्याचा उल्लेखही कोठे करू नका, असेही जबाबदारी घेण्यासाठी पुढे आलेला प्रत्येकजण सांगत होतो.
आम्हाला आता खूप सुरक्षित वाटते..!
खूप त्रास सहन केला, आता ते शक्य नाही कारण माझा मराठी बांधव माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी ठामपणे पाठिशी उभा राहिला आहे. त्यामुळे आम्हाला खूप सुरक्षित वाटू लागले आहे…,फ ही प्रतिक्रिया आहे, ज्या पाच कन्येंच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाले त्यापैकी दोघींची. दोघींनी ज्यावेळी आपली भूमिका मांडली त्यावेळी टाळ्यांचा गजर झाला. माझे मराठा बांधव एकत्र आले, त्याचा मला अभिमान वाटतो. माझे भाऊ-बहिण एकत्र आले आहेत. आम्ही आता जगाला मराठा म्हणजे काय हे दाखवून देवू, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.