दलित नेत्यांनाही फटकारले
सातारा : मी भारतीय जनता पार्टीची सक्रिय कार्यकर्ती असली तरी सातारा येथील मराठा क्रांती मोर्चात मी पक्षाची कार्यकर्ती म्हणून नव्हे तर मराठा म्हणूनच सहभागी होणार असल्याचा नारा माजी आमदार कांताताई नलावडे यांनी बुधवारी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाला विरोध करू नका, असे म्हणाजया माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानतच त्यांनी महाराष्ट्रातील तथाकथित दलित नेत्यांनाही चांगलेच फटकारले आणि समाजातील वातावरण दुषित करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
सातारा येथे दि. 3 ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात रान पेटले आहे. लाखो मराठा बांधव त्याच्या तयारीसाठी पुढे आले असून भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य असलेल्या आणि मुळच्या सातारा तालुक्यातील असलेल्या माजी आमदार कांताताई नलावडे यांनीही मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे नमूद करतच जिल्ह्यातील लाखो मराठी बांधवांनी यादिवशी रस्त्यावर यावे, असे आवाहनही केले.
मी भाजपची असले तरी मुळची मी मराठा आहे,असे सांगतच त्यांनी सातारा जिल्ह्यात निघत असलेला मोर्चा अभिमान आणि कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, मी सातारची मुलगी आहे, सातारची सून आहे. अनेक वर्षांनंतर मराठा समाज रस्त्यावर येत आहे. कोपर्डीची घटना हे त्यास निमित्त असलेतरी गेली अनेक वर्षे दाबून ठेवलेला आक्रोश आता दिसू लागला आहे. मराठा समाजाच्या असंख्य अडचणी आहेत. हा समाज आता आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. आपण मुकमोर्चा काढणार आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे. मराठा समाज एक होतो आहे. हा समाज कधी सहजासहजी एकत्र येत नाही. मात्र, अनेक वर्षे साचून राहिलेला आक्रोश आता बाहेर पडला असून त्याला त्याच्या हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे.
त्या म्हणाल्या दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजातील काही नेत्यांशी चर्चा करत अडचणी जाणून घेतल्या. त्यांनीही मागण्यांच्या अनुषंगाने सकारात्मकता दर्शविली आहे. माजी खासदार प्रकाश आंबेडकरांनी मराठा क्रांती मोर्चाफचे स्वागत केले आहे. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देते. मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने काही मंडळी अफवा पसरवित आहे. अॅट्रॉसिटी रद्द करा, अशी आमची मुळीच मागणी नाही. मात्र, त्याचा दुरुपयोग केला जात आहे. त्याला आमचा विरोध आहे. या कायद्यात असणाजया जाचक अटी रद्द कराव्यात यावरही आम्ही ठाम आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी सहकार्य करणारे मराठा समाजातीलच होते. त्यामुळे आम्ही दलितविरोधी नाही, ही बाब समजून घ्यावी. मराठा क्रांती मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचे आहे. मोर्चा मूक असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने सहभागी होताना जबाबदारीनेच वागायचे आहे. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, याची काळजी प्रत्येकांनी घ्यायची आहे. मराठा समाज एक होतो आहे. याचा आम्हा मराठी बांधवांना अभिमान आहे. खजया अर्थाने मराठा समाजाला आता विकासाच्या मुख्य प्रवाहात यायचे आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे. त्यांच्यासमोरही जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहे. त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षणाचे प्रश्न आहे. हे प्रश्न सोडवावेच लागणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील भावा-बहिणींना आणि माता-भगिनींनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, अशी माझी त्यांना कळकळीची विनंतीही आहे.फ
तथाकथित दलित नेत्यांकडून अॅट्रॉसिटीचा गैरवापर
माजी आमदार कांताताई नलावडे यांनी महाराष्ट्रातील आणि सातारा जिल्ह्यातील तथाकथित दलित नेत्यांच्या कार्यपध्दतीवर चांगलेच आसूड ओढले आणि ते अॅट्रॉसिटीचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, मराठा क्रांती मोर्चा दलितविरोधी नाही, ही बाब दलित नेत्यांनी समजून घ्यावी. आम्ही दलितांवर अन्याय करत नाही आणि कोणी करत असेल तर ते चालूही देणार नाही. आमचा विरोध तथाकथित दलित नेत्यांना आहे कारण त्यांच्याकडून अॅट्रॉसिटीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे. यामुळे अनेकांवर अन्याय झाला आहे.