सातारा : मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने मराठा क्रांती मूक मोर्चाच्यावतीने पुकारण्यात आलेला अहिंसावादी लढा आता अनोख्या टप्प्यावर आला आहे. मुंबईतील मोर्चापूर्वी सरकारला आपली ताकद दाखवून देण्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मराठा बांधव एकवटला आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक मराठ्याचे एकच काम… 31 जानेवारीला हायवे जाम..! असा नारा देत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील प्रत्येक मराठा बांधव चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्यासाठी मंगळवार, दि. 31 जानेवारी रोजी रस्त्यावर उतरणार आहे.
सातारा जिल्ह्यात पुणे-बंगळूर महामार्ग त्याचबरोबर तालुक्यातील प्रमुख ठिकाणी होणार्या चक्काजाम आंदोलनाची तयारी पूर्ण झाली असून मंगळवार कधी येतोय याचीच उत्सुकता प्रत्येक मराठा बांधवाला फक्त लागून राहिली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवार, दि. 31 जानेवारी रोजी जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव नेमून दिलेल्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली असून कोणत्याही परिस्थितीत आणि शांततेच्या मार्गाने चक्काजाम आंदोलन यशस्वी करण्यासाठीची आवश्यक ती तयारी पूर्ण झाल्याची माहिती सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आली. दरम्यान, गुरुवारी, दि. 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनी सातारा येथील कल्याण रिसॉर्ट हॉटेलमध्ये सकल मराठा समाजाची एक बैठक झाली. या बैठकीत चक्काजाम आंदोलन यशस्वी करण्याबरोबरच प्रत्येकांनी नेमून दिलेल्या ठिकाणीच अकरा ते दोन या वेळेत शांततेच्या मार्गाने कोणताही अनुचित प्रकार न करता आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
मराठा क्रांती मूक मोर्चा आता अनोख्या टप्प्यावर आला असून जागतिक पातळीवरही त्याची दखल घेण्यात आली आहे. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्याची मागणी करतच मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि कोपर्डी अत्याचार प्रकरणातील नराधमांना फाशी मिळावी म्हणून महाराष्ट्र तसेच देशाच्या कानोकोपर्यात विखुरलेला समाज आपल्या बांधवांसाठी एकवटला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने राज्य सरकारने अजून कोणतीही सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. तरीही मराठा समाजा शांततेच्या मार्गाने आपली भूमिका सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. मार्च महिन्यात मराठा क्रांती मूक मोर्चा मुंबईत धडकणार आाहे. तत्पूर्वी मंगळवार, दि. 31 जानेवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यातही ठिकठिकाणी होणार्या चक्काजाम आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या बैठकीत मराठा क्रांती मूक मोर्चाच्या संयोजकांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले. सातारा जिल्ह्यात झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चावेळी ज्यांच्याकडे तालुक्यांचे नियोजन होते त्यांच्याकडेच यावेळच्या चक्काजाम आंदोलनाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी आपआपल्या परिसरातील मराठा बांधवांना एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आले आाहे.
दरम्यान, शुक्रवारी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मूक मोर्चाचे संयोजक प्रतिनिधी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना भेटले आणि त्यांनी प्रजासत्ताक दिनी झालेल्या बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. चक्काजाम आंदोलनाची आचारसंहिता, चक्काजाम आंदोलनात नेमके काय करणार यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. दरम्यान, चक्काजाम आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यावरही लक्ष देण्याची विनंती पोलीस अधीक्षक पाटील यांनी मराठा क्रांती मूक मोर्चा संयोजकांना केली. याचवेळी सातार्यात झालेल्या मोर्चावेळी मराठा बांधवांनी दाखविलेल्या संयमाचेही पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी कौतुक करत चक्काजाम आंदोलनातही सहकार्य करण्याची विनंती केली.
चौकट करणे
वाढे फाट्यावर होणार भजन
सातार्यात होणारे मराठा क्रांती मूक मोर्चाचे चक्काजाम आंदोलन पुणे-बंगळूर महामार्गावरील वाढेफाटा येथे होणार आहे. अकरा ते दोन या वेळेत हे चक्काजाम आंदोलन होणार असून यावेळी वारकरी संप्रदायातील मंडळी भजन म्हणणार आहेत. वाढेफाटा येथील आंदोलनात सातारा शहर आणि परिसरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, युवक, युवती आणि ज्येष्ठ नागरिक उत्सफूर्तपणे सहभागी होणार आहेत. सातार्यातील सर्व समाजबांधव आणि व्यापारीही चक्काजाम आंदोलनाचे साक्षीदार होणार आहेत.
लोकप्रतिनिधी अन इच्छुकांनाही दिला इशारा
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला असून अनेक इच्छुकांनी विविध गट आणि गणांतून शड्डू ठोकला आहे. सातारा जिल्हाही त्याला अपवाद नाही. सातारा जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांकडून अनेक इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात मराठा क्रांती मूक मोर्चाच्यावतीने होणार्या चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन लोकप्रतिनिधी आणि इच्छुकांना करण्यात आले आहे. यावेळी जर कोणी लोकप्रतिनिधी त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असणारा उमेदवार अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले अथवा चक्काजाम आंदोलनात कोठे आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मराठा समाजाने मतदान करू नये, असा निर्णय सातार्यात प्रजासत्ताक दिनी झालेल्या चक्काजाम आंदोलन पूर्वतयारीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
……………………..
सातारा जिल्ह्यात नेमून दिलेल्या ठिकाणी चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपआपल्या परिसरातील लोकांनी कोणत्या ठिकाणी उपस्थित राहून आपले कर्तव्य बजावयाचे आहे, याची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. उदाहरणार्थ खंडाळा तालुक्यातील शिरवळ आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी शिरवळ चौक येथे जमायचे असून सकाळी अकरा ते दोन या वेळेत चक्काजाम आंदोलन करावयाचे आहे.
चक्काजाम आंदोलनाची ठिकाणे खालील प्रमाणे आहेत.
शिरवळ : शिरवळ चौक
खंडाळा : पारगाव चौक
पाचवड : आनेवाडी टोलनाका
सातारा : वाढेफाटा
उंब्रज : तळबीड टोलनाका
दहिवडी : पिंगळी चौक
कराड : कोल्हापूर नाका
पुसेगाव : शिवाजी चौक
कोरेगाव : आझाद चौक
रहिमतपूर : रहिमतपूर चौक
फलटण : फलटण चौक
लोणंद : बसस्थानकासमोर
वाठार : रस्त्यावरच
मेढा : बाजारचौक
पाटण : जुने स्टँड
वाई : बावधन नाका
वडूज : वडूज चौक
म्हसवड : म्हसवड चौक
……………………
सकल मराठा समाजाने जाहीर केलेली आदर्श आचारसंहिता
– नेमून दिलेल्या ठिकाणीच सहभागी व्हा
– तालुकानिहाय बैठकात घेण्यात याव्यात
– चक्काजाम आंदोलन शिस्तबध्द आहे
– कोणीही गालबोट लूवू नये
– कोणी संशयित असेलतर पोलिसांना माहिती द्या
– वाहनांवर दगडफेक करु नये
– कोणत्याही वाहनांची हवा सोडू नये
– रस्त्यावर कोणीही टायर पेटवू नये
– अग्निशमन दल, रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करुन द्या
– पोलिसांना सहकार्य करा
– सहभागींनी पाण्याची बाटली जवळ ठेवावी