फलटण: डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मले नसते तर मी मंत्री झालो नसतो त्यांच्या पुण्याईने आम्हाला चांगले दिवस आल्याने सामाजिक उत्तरदायित्व म्हणुन गेल्या अडीच वर्षात सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातुन सामाजिक विकासाचे काम करीत आहोत, डॉ. बाबासाहेबाच्या शिक्षणाची देण म्हणुन सर्वसामान्यांना न्याय या भुमिकेतुन आम्ही काम करत असल्याचे सांगत राज्य सरकारचा सामाजिक न्याय विभाग डॉ. आंबेडकरांच्या विचाराने चालविला जात असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री ना. राजकुमार बडोले यांनी केले.
मंगळवार पेठेतील विविध दलित संघटना, सर्वपक्षीय कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात ना .बडोले यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी डॉ.प्रशांत पगारे डॉ.अशोक शिलवंत, भाजपचे नंदकुमार ननावरे, शहर अध्यक्ष संदिपकुमार जाधव,सातारा समाजकल्याण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श ज्या ज्या ठिकाणी झाला. त्या सर्व स्थळांचा विकास करण्याचा आपला प्रयत्न सरकारच्या माध्यमातुन राहणार असल्याचे सांगत डॉ.आंबेडकर 1939मध्ये फलटणमध्ये आले होते ज्या ठिकाणी त्यांचा पदस्पर्श झाला त्या ठिकाणचा सरकारी निधीतुन विकास केला जाईल यासाठी तसा प्रस्ताव कार्यकर्त्यानी सामाजिक न्याय विभागाकडे द्यावा असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
राज्यात आमचे सरकार आल्यापासुन लंडन येथील डॉ.आंबेडकरांची वास्तु शासनाने ताब्यात घेतली. इंदू मिलच्या जागेचा प्रश्न सोडविला,मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लावला, विकासाच्या अनेक योजना कार्यान्वीत केल्या. मागील विकासातील सर्व अनुशेष आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करीत आहोत.मागासवर्गीय विकासाचा 500 कोटी निधी सामाजिक न्याय विभागाने अन्य ठिकाणी वळवला असा आमच्यावर होत असलेला आरोप पुर्णतः खोटा आहे विकास निधी कुठेही वळवला नाही असा स्पष्ट खुलासा ना. बडोले यांनी यावेळी केला.
डॉ .आंबेडकरांच्या प्रेरणा व स्फुर्ती मुळे अनेक पिढ्या शिकल्या पुढे गेल्या आज समाजात बदल होतानाचे चित्र दिसु लागले आहे.डॉ .बाबासाहेबांचे हे उपकार आहेत म्हणुनच आम्ही या उपकाराची उतराई म्हणुन काम करीत असल्याचे सांगत जानेवारी महिन्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या तज्ञ मंडळीची शासनाच्या माध्यमातुन लंडन येथे कॉन्फरन्स आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ. पगारे, शिलवंत यांची भाषणे झाली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुध्द व डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालुन आभिवादन करण्यात आले.दलित पँथर चळवळीत काम केलेल्या मधुकर काकडे, विजय येवले, मुन्ना शेख, संजय निकाळ्जे, दत्ता अहिवळे यांचा सत्कार मंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सुत्रसंचलन सिध्दार्थ प्रबुद्ध यांनी केले.
कार्यक्रमास सुधिर अहिवळे, नंदकुमार मोरे, अड.रोहित अहिवळे, सनी काकडे, शाम अहिवळे, रोहित माने, आप्पा काकडे, सागर लोंढे, शक्ती भोसले, संग्राम अहिवळे, दत्ता भोसले यांचे सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,महिला कार्यकर्ते उपस्थित होते.