सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इयत्ता पहिलीमध्ये ज्या (प्रतापसिंह) सातारा हायस्कूलमध्ये 7 नोव्हेंबर 1900 रोजी प्रवेश केला, तो ऐतिहासिक दिवस खुप महत्वाचा आहे. त्यांचे पहिले पाऊल या शाळेत पडले. पुढे ते शिकले त्यामुळे देशातील माझ्यासारखे दिन दलित शिकले. त्यांचे हे योगदान देश कधीही विसरणार नाही. आज राज्यात विद्यार्थी दिन साजरा झाला. पुढच्या वर्षीपासून संपूर्ण देशात हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करु असे, प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज केले.
यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक निंबाळकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, प्रांताधिकारी स्वाती देशमुख पाटील, तहसिलदार निलप्रसाद चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देवीदास कुलाळ, समाज कल्याण अधिकारी विजय गायकवाड, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, प्रतापसिंह हायस्कूलच्या मख्याध्यापिका शबनम मुजावर, ए. के. गायकवाड, अरुण जावळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे विशेष समित्यांचे सभापती, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आजच्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये आणि त्याकाळच्या सातारा हायस्कूलमध्ये 7 नोव्हेंबर 1900 रोजी इयत्ता पहिलीच्या वर्गात छोट्या भिमरावांनी प्रवेश घेतला जो दिवस भारतीय इतिहासातील अभूतपूर्व दिवस आहे. ते शिकले म्हणून पुढे लाखो दलित शिकले. माझ्यासाराखी दलित मुलं त्यांच्या या ज्ञानामुळे आणि पुढे त्यांनी लिहलेल्या घटनेमुळे मंत्रीही झाले. त्यामुळे हे प्रतापसिंह हायस्कूल देशाचे प्ररेणास्थळ असल्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्पर्शाने पावन झालेल्या सर्व स्थळांचा विकास करण्यासाठी आमचा प्रयत्न असून या शाळेच्या विकासासाठीही मोठा निधी देवून ही शाळा पूर्ण देशातील विद्यार्थ्यांचे प्ररेणास्थळ होईल असा आमचा प्रयत्न राहील, असे बडोले यांनी सांगितले. सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने ही शाळा 5 वी ते 10 वी पर्यंत चालविली जाते. ही शाळा गुणवत्तापूर्ण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या आम्ही देवू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ज्या शाळेत डॉ. बाबासाहेबांनी आयुष्यातले पहिले पाऊल टाकले, ती शाळा पाहताना आणि ज्या रजिस्टरमध्ये त्यांचे नाव आणि त्यांची स्वाक्षरी (मोडी लिपीमध्ये) पाहताना अंगावर रोमांच उभे राहीले अशी भावना सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. आंबेडकरांनी ज्या शाळेत पहिल्यांदा पाऊल टाकले ती प्रतापसिंह हायस्कूल शाळा आणि सर्वोच्च शिक्षण ज्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये घेतले ते दोन्ही ठिकाण पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभल्याचे कांबळे यांनी यावेळी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकविले. प्रॉब्लेम ऑफ रुपीझ सारख्या पुस्तकातून देशाला अर्थ साक्षर केले. त्यांच्या संकल्पनेतून रिझर्व्ह बँकेची निर्मिती झाली. अशा महामानवाचे शिक्षण या शाळेत झाले. त्यामुळे ही शाळा संपूर्ण देशासाठी महत्वाची आहे. त्या शाळेच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार जिल्हा परिषदेला सर्वतोपरी मदत करेल असे राज्यमंत्री दिली कांबळे यांनी आश्वासन दिले.
प्रमुख पाहुण्यांना सामजिक न्याय विभागाच्यावतीने शाळा रजिस्टर मधील डॉ. बाबासाहेबांच्या नावाच्या नोंदचे पान फ्रेम असलेले स्मृती चिन्ह भेट म्हणून देण्यात आले.
सातारा जिल्हापरिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्हा परिषदेचया या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकले असल्यामुळे ही शाळा चांगल्या प्रकारे विकसीत केली जाणार असल्याचे सांगून सातारा जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेत गेल्या वर्षी राज्यात दुसरा तर यावर्षी पहिला क्रमांक असल्याचे सांगितले. ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य यशवंत पाटणे यांनी आपल्या ओघवत्या शैलित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण विषद केले. त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांचाही मागोवा यावेळी घेतला.
डॉ. बाबासाहेबांच्या शाळा नोंदीचे रजिस्टर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाच्यावेळी ज्या रजिस्टरमध्ये नोंद घेतली आहे. ते ऐतिहासिक रजिस्टर आज सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पाहिले. त्या रजिस्टरमध्ये अनुक्रमांक 1914 वर भिवा रामजी आंबेडकर असे नाव असून जन्म तारीख 14 एप्रिल 1891 ही आहे. पुढच्या कॉलममध्ये डॉ. बाबासाहेबआंबेडकरांची मोडी लिपीत स्वाक्षरी आहे. पुढच्या कॉलममध्ये शाळा प्रवेशाचा दिनांक आहे. 7 नोव्हेंबर 1900 आणि त्या पुढे मार्च 1904 मध्ये शाळा सोडल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. हे रजिस्टर जिल्हा परिषदेच्याया शाळांनी लॅमिनेट करुन ठेवले आहे. त्या मुख्याध्यापकाच्या ऑफिसबाहेर शाळा सुरु झाल्यापासून 1850 पासूनच्या मुख्याध्यापकांचे नांवे आहेत. 1900 ते 1907 पर्यंत ग. व्यं. जोशी हे मुख्याध्यापक हाते. हे सर्व दोन्ही मंत्र्यांनी अतिशय आस्थेनी पाहुन हे रेकॉर्ड अतिशय उत्तमरितीने जपून ठेवल्याबद्दल जिल्हा परिषद शाळेचे कौतुक आणि आभार मानले.