सातारा : राजकारणात तत्व व निष्ठेने काम करायचे असते. स्वत:च्या स्वार्थासाठी काहीही करून चालत नाही. कार्यकर्त्यांचे कामच बोलत असते. त्यामुळे त्याच्या पाठीमागे लोक येतात. प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण सर यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकिय, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम केले आहे. या मेळाव्याला झालेली प्रचंड गर्दी त्याची पोहोच पावती देवून गेली आहे. सरांच्या कार्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच नोंद घेईल, असा विश्वास आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला. दरम्यान, यावेळी त्यांनी आक्रमक शैलीत भाषण करून शांत व संयमीपणा हा विषय आता उरमोडीच्या नदीत सोडून दिला असल्याचे सांगताना जशास तसे उत्तर देण्याचा इरादा स्पष्ट केला.
सातारा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शेंद्रे गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा भाटमरळी येथील पाटील वाडा येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. मेळाव्यास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अॅड. लालासाहेब पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, अरविंद चव्हाण, रामचंद्र चव्हाण, उत्तमराव नावडकर, मोहनराव साळुंखे यांच्यासह शेंद्रे गटातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटींचे चेअरमन यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. भोसले म्हणाले, सातारा तालुक्यातील वर्णे आणि शेंद्रे हे दोन गट खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यामुळे येथे इच्छुकांची संख्या अधिक आहे. मात्र, पक्षाच्या ध्येयधोरणानुसार उमेदवारीबाबतचा निर्णय होईल. सर्वांनी पक्ष देईल त्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायचे आहे. प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकिय, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. जनमाणसात त्यांच्याबाबत आदराची व आपुलकीची भावना आहे. आज मेळाव्याला झालेली गर्दी त्याची साक्ष देत आहे. मेळाव्यास गटातील 32 गावाच्या बहुसंख्य लोकांनी उपस्थिती लावली आहे. चव्हाण सरांच्या कार्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच नोंद घेईल. 16 जानेवारी पासून प्रत्येक तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे सांगून आ. भोसले म्हणाले, भाऊसाहेब महाराजांच्या निधनानंतर ज्येष्ठ व जाणकार कार्यकर्त्यांनी मला मार्गदर्शन केले. म्हणून मी आज लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या समोर उभा राहू शकलो. होवू घातलेली जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही अटीतटीची होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीला पाठबळ देणारे व राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असणार्या उमेदारांच्या पाठीमागे आपण आपली ताकद लावावी. जेेणे करून आपल्या भागाचा विकास होण्यास मदत होईल.
राजकारणात तत्व व निष्ठेने काम करायचे असते. स्वत:च्या स्वार्थासाठी काहीही करून चालत नाही. मात्र, आज राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्याचे काम सातारा जिल्ह्यात होत आहे. सत्ता महत्वाची नाही तर सत्तेचा उपयोग भागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी किती केला जातो हे महत्वाचे आहे. भावनात्मक होऊन मतदान करणे चुकीचे होईल. पक्षाची ताकद मागे असल्यास तालुक्याचे प्रश्न सहज सुटतील, असा विश्वासही त्यांनी मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, शांत आणि संयमी हा विषय उरमोडीत सोडून दिला आहे. आता आक्रमक पध्दतीने काम करण्याची वेळ आली आहे. विरोधकांनी सातारा तालुक्यात केलेले काम दाखवावे आणि मगच आपल्याशी बोलावे. आपणास प्रश्न विचारण्याची त्यांची लायकी नाही. विरोधकांनी दम दिला म्हणून माझ्याकडे तक्रार घेऊन येवू नका तर जशास तसे उत्तर द्या. मी तुमच्या पाठीशी आहेच, असा विश्वासही त्यांनी दिला.
देशभर नोटाबंदीमुळे सामान्य माणूस आर्थिक संकटात सापडला आहे. हे सरकार शेतकर्यांच्या विरोधात असलेले दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात विकास सोसायट्या, जिल्हा बँका, तसेच सहकारी संस्था त्यांनी मोडीत काढण्याचा घाट घातला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा बँकेची नाबार्ड, आयकर विभाग, ईडीने तपासणी केली, त्यांना काहीही सापडले नाही. आता सीबीआयची आम्ही वाट बघत आहोत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक देशात एक नंबर असल्याचेही बोलताना त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अॅड. लालासाहेब पवार म्हणाले, उमेदवारी मागणीच्या वेळी रुसवे-फुगवे असतात, मात्र पक्षाने उमेदवार जाहीर केल्यानंतर आपण रुसवे-फुगवे सोडून पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागे ठाम उभे राहिले पाहिजे. विरोधकांनी एकही संस्था उभी केली नाही. एकाही बेरोजगाराला रोजगार दिला नाही. मात्र, दुसर्यांनी उभ्या केलेल्या संस्थेचे ऑडीट करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरु केला आहे. या निवडणुकीत आपल्या भागाचा विकास करणार्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभे राहणे गरजेचे आहे.
शेंद्रे जिल्हा परिषदेच्या गटातून मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी. पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवेन, आजपर्यंत भाऊसाहेब महाराज व बाबाराजे यांनी दाखवलेला विश्वास व केलेले सहकार्य यामुळे मी आजपर्यंत माझ्या भागातील लोकांसाठी विकास कामे करू शकलो. या निवडणुकीत मला एक संधी द्या मी त्याचे सोने करून दाखवतो, असा विश्वासही प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक संभाजी जाधव यांनी केले. सुत्रसंचलन विठ्ठल देशमुख यांनी केले. सयाजी चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.