सातारा : सातारा शहरातील 112 भवानी पेठेतील मोती चौकातील मुथा आर्किडमधील गाळा नं. 3 व 4 च्या रुपस्वामिनी या साडीच्या दुकानास आग लागून या जळीतामध्ये 6 लाखाच्या फर्निचरसह, साड्या, ड्रेस, टोप्या, इलेक्ट्रीक साहित्य असे मिळून एकूण 28 लाखाचे नुकसान झाले. सातारा अग्निशामक दलाच्या बंबाने सुमारे पाच तासाच्या अथक परिश्रमानंतर आग विझविण्यात यश आले. मात्र, या आगीने गाळ्यातील 14 दुकानास त्याची मोठी झळ बसली आहे.
याबाबत भवानी पेठेतील मोती चौकातील मुथा आर्किडमधील रुपस्वामिनी या दुकानाचे मालक विजय माणिक निकम (वय 39, रा. सिव्हील कॉलनी) खंडोबाचा माळ संभाजीनगर, ता. सातारा यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, आपण शुक्रवारी सायंकाळी 9 वाजता रुपस्वामिनी साडी सेंटर दुकान नेहमी प्रमाणे बंद करुन पणे येथे गेलो होतो. शनिवारी दुकान बंद असते. रविवारी दुकान उघडण्यासाठी माझी पत्नी आली होती, मात्र माझ्या कापड दुकानाशेजारी असणारे रमेश मुद्रावळे यांनी रविवारी 7 वाजण्याच्या पूर्वी दुकानास आग लागल्याने सांगितले. दुकानास लागलेली आज विझविण्यासाठी सातारा नगरपालिकेचा अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी बोलविण्यात आला.
यानंतर सकाळी 7 पासून दुपारी 12 पर्यंत मोती चौकात कापड दुकानास लागलेली आग विझविण्यासाठी सातत्याने परिश्रम घेण्यात आले. मात्र तोपर्यंत कापड दुकानातील महागड्या साड्या, ड्रेस, टॉवेल, टोप्या, लेगीज, तसेच इलेक्ट्रीक साहित्य टेलीफोन, फॅन, फर्निचर जळून खाक झाले. सुमारे 6 लाखाचे फर्निचर जळाले आहे. तर एकूण 28 लाखाचे मोठे नुकसान झाले आहे. मुथा आर्किडमधील इतर 14 गाळ्यांना आगीची झळ पोहचून नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद शाहुपूरी पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.