* 3 लाख 35 हजार उमेदवार बजावणार मतदानाचा हक्क
* जिल्ह्यात अडीच हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त
* प्रशासन यंत्रणा सज्ज
सातारा : जिल्ह्यात 8 नगरपालिका व 6 नगरपंचायती अशा 14 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी रविवारी दि. 27 रोजी जिल्ह्याच्या राजकारणात उतरलेल्या 284 जागांसाठी उमेदवारांचे भवितव्य मशिन बंद होणार असून 14 पालिका क्षेत्रातील 3 लाख 35 हजार 937 मतदार त्यांच्या भवितव्याचा निर्णय घेणार आहेत. यामुळे सातारा जिल्ह्याला पोलिस छावणीचे स्वरुप आले असून प्रत्येक पालिका कार्यक्षेत्रात पोलिस बंदोबस्तामागे वोटींग मशीन रवाना करण्यात आल्या आहेत. सायंकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी या सर्व तयारीचा आढावा घेतला. राष्ट्रवादी विरुध्द भाजप आणि काँग्रेस प्रणित आघाड्यांमध्ये काट्याची टक्कर होत असून बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची प्रतिष्ठापणाला लागली आहे. रात्री 10 वाजता प्रचार तोफा थंडावल्या आणि राजकीय समीकरणे फिरवू पाहणार्या वैयक्तिक गाठीभेटींचा जोर उशीरापर्यंत वाढला.
जिल्ह्यात 190 प्रभागात एकूण 479 मतदान केंद्रा असून या केंद्रांवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 असे मतदान होणार आहे. या प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी महसूल व जिल्हा प्रशासनाचे सुमारे 830 कर्मचारी रविवारी त्या त्या मतदान केंद्रांवर तैनात राहणार आहेत. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या आदेशानुसार मतदान केंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात आले असून 2500 पोलीस, दोन स्ट्रायकिंग फोर्स, राज्य राखीय दलाच्या दोन तुकड्या व 35 अधिकार्यांची कायदा सुव्यवस्थेसाठी स्वतंत्र नेमणूक करण्यात आली आहे. मुद्गल व जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी या सर्व तयारीचा आढावा घेत सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

सातारा जिल्ह्यात सातारा, कराड, रहिमतपूर, महाबळेश्वर, पाचगणी, म्हसवड, फलटण, वाई या 8 नगरपालिका तर पाटण, मेढा, कोरेगाव, दहिवडी, खंडाळा, वडूज या सहा नगरपंचायतीसाठी रविवारी मतदान होत आहे. गेल्या पंधरा दिवसापासून उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचाराची यंत्रणा आपल्या प्रभागामध्ये राबविण्यात आली. पॅनेलप्रमुखांनीही आपले जाहिरनामे प्रसिध्द करून येत्या पाच वर्षात विकासाची कामे काय करणार आहे असा अजंडा मतदारांसमोर मांडला आहे. सातारा शहरात 40 जागेसाठी नगरविकास आघाडी, सातारा विकास आघाडी, भाजपा, शिवसेना, आरपीआय याबरोबरच अपक्षांनी दंड थोपटून निवडणूकीला सामोरे जात आहे. साविआचे अध्यक्ष खा.उदयनराजे भोसले तर नविआचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कोपरा सभा, बैठका जाहिर सभेमध्ये अगदी खालच्या स्तरापर्यंत प्रचाराची पातळी गाठून एकमेकांची उणीदुणी काढण्यात धन्यता मानली. गेल्या दहा वर्षातील केलेल्या कामाचा लेखा-जोखा मांडण्याचा प्रयत्न मतदारांपुढे केला आहे तर साविआने आपणच केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय नविआचे नेते घेत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपाचे खंडनही करण्यात येऊन मतदारांची दिशाभूल दोन्ही आघाडीचे नेतेमंडळी करीत असल्याचा आरोप भाजपाचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सुवर्णादेवी पाटील यांनी प्रचार सभेमध्ये केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गांधी मैदानावर सभा घेऊन भाजपाला सत्ता नगर पालिकेत मिळाल्यानंतर बेघरांना आम्ही तातडीने घरे देऊ असे आश्वासनही देण्यात आले आहे. सातारा शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आघाडीच्या दोन्ही नेत्यांनी व समर्थकांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. रविवारी होणार्या मतदानावेळी बोगस मतदान होऊ नये यासाठी शासकीय यंत्रणा सतर्क असून मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र नसेल बँक पासबुक, रेशन कार्ड, पॅनकार्ड किंवा आधार कार्डपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येऊन मतदाराला मतदान करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. सातारा नगर पालिके अंतर्गत मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी स्वाती देशमुख, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सर्व कर्मचार्यांचे बैठक घेऊन योग्य त्या सुचना केल्या आहेत. मतदान केंद्राच्या ठिकाणी मतपेट्या आजच रवाना करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राच्याठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त, याशिवाय विद्युत पुरवठा, करण्यात आलेला आहे.
185 उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरविणार
सातारा नगर पालिकेच्या 40 जागेसाठी एकुण 185 उमेदवार रिगणांत असून गेल्या पंधरा दिवसापासून उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचाराची रणधुमाळी पहायला मिळाली. रविवारी 121 मतदान केंद्रावर 779 अधिकारी व कर्मचार्यांच्या सहकार्याने मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. एकुण 93 हजार मतदार ांच्या हाती उमेदवारांचे भवितव्य राहणार आहे.
121 इव्हीएस मशिन्ससह बॅलेट उपलब्ध
सातारा न.पा.च्या निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 121 मतदान केंद्रामध्ये तेवढेच ईव्हीएस मशिन्स उपलब्ध ठेवण्यात आले असून 360 बॅलेट पुरविण्यात आलेल्या आहेत. मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदारांना त्यांचे नाव, मतदान क्रमांक सहज उपलब्ध व्हावा म्हणून खास केंद्रस्तर अधिकारी प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत.