सातारा : देशात नोटाबंदी लागु केल्यापासून, सर्वजण दररोज बॅन्कांमध्ये, रांगेत दिसतो आहे. सर्व आर्थिक व्यवहार मोठया प्रमाणात ठप्प झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मोबाईल व्हॅनव्दारे चलन पुरवठा करणारे कौन्टरर्स सुरु करण्यासह, नोटाबंदीमुळे आरबीआयकडे जमा झालेल्या काही लाख कोटी रुपयांमधून, शेतकर्याची कर्जमाफी आणि पुढील तीन वर्षात सिंचन प्रकल्प उभारणे, एसटीबस मधुन 50 किलो शेतीमाल वाहतुक करण्याची दिलेली सवलत तशीच पुढे कायम करणे, शेतकर्याचा माल विकण्याची यंत्रणा पणन खात्यामार्फत उभारणे आदी उपाययोजना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सरकारला सुचवल्या असून, शेतकर्यांच्या अडचणी वेगाने सोडवून शेतकर्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले पाहीजे असे त्यांनी निवेदनाव्दारे सरकारला आवाहन केले आहे.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रसरकार आणि राज्यसरकारला सुचवलेल्या उपाययोजनांमध्ये त्यांनी असे नमुद केले आहे की, सर्वप्रथम सर्व कृषी उत्पन्न बाजारसमित्यांमध्ये मोबाईल व्हॅन व्दारे चलन पुरवठा करणारे कौन्टर्स काढली पाहिजेत. या कौन्टरवर शेतकर्यांना रोकड उपलब्ध करुन दिल्यास, शेतकर्यांना चांगला दिलासा देता येईल. शेतीमाल घेवून आलेल्या शेतकर्यांना, त्यांच्या मालाचे पैसे रोख स्वरुपांत मिळणे गरजेचे असते, व्यापार्यांकडे रोकड उपलब्ध नसल्याने व्यवहार होत नाहीत किंवा धनादेशाव्दारे रक्कम दिली जाते.
मोबाईल व्हॅन कौन्टर उभारल्यास व्यापार्यांकडून धनादेश घेवून ती रक्कम शेतकर्यांना रोख स्वरुपांत उपलब्ध करुन देणे शक्य आहे. नवी मुंबई,पुणे,नागपूर,लातूर अशा सर्व बाजारसमित्यांमध्ये बॅन्कांच्या सहकार्याने मोबाईल व्हॅन कौन्टर्स उभारणे सहज शक्य आहे. जास्तीत जास्त 50 मोबाईल व्हॅन याकरीता लागतील.
सध्या सोयाबिन,कापूस,गूळ,डाळींब आणि भाजीपाला मोठया प्रमाणात बाजारात दाखल होत आहे. त्या सर्व शेतकर्यांना या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातुन दिलासा देणे सहज शक्य आहे. सरकारने ही व्यवस्था ताबडतोब उपलब्ध केली पाहिजे.
नोटाबंदीच्या निर्णयामुळे कित्येक लाख कोटीरुपये बॅन्कांमार्फत आरबीआयकडे जमा झाले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. मोठया प्रमाणावर शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकूण परिस्थितीमुळे शेतकरी चांगलाच गाजलेला आहे. या परिस्थितीत नोटाबंदी मधून जमा झालेल्या रक्कमेतून काही रक्कम शेतकर्यांसाठी बाजुला काढल्यास आपले शेतकरी कर्जमुक्त होवू शकतील. बॅन्कांकडे मोठया प्रमाणावर पैसा उपलब्ध झालेला असताना, सरकारने शेतकर्यांच्या कर्जमाफीचा गांभिर्याने विचार करावा. कर्जावरील व्याजदर कमी करावा डिआरटी लावू नका म्हणजे शेतकर्यांना काहीसा दिलासा मिळेल.महाराष्ट्र सरकारने शेतकर्यांना 50 किलो माल एसटीने वाहतुक करण्याची मोफत सुविधा दिली आहे. सरकारने हे धोरण कायम करायला हवे त्यातुनही शेतकर्याला मोठा दिलासा मिळेल.
याचबरोबर शेतकर्यांनी आपला शेतमाल शहरात आणुन कोठे विकायचा यासाठी यंत्रणा उभी करण्याची जबाबदारी पणन खात्याने उचलावी, ते त्यांचे कामच आहे.शेतकरी अडचणीत असताना जमा झालेल्या काळया पैशातून शेतकर्यांना कर्जमाफी दिली जाईल याचे सरकारने सुतोवाच केले तरीही शेतकर्यांना मोठया प्रमाणात दिलासा मिळेल, त्याचबरोबर सरकारकडे जमा झालेल्या पैशातुन सिंचन प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण केल्यास पैशाचा विनियोग चांगला होण्याबरोबरच शेतकर्याला चांगली सिंचन सुविधा देण्याचा दिलासा देता येईल.तसेच काळापैसा बाळगणार्यांनी कचर्यात किंवा पाण्यात पैसे फेकून देण्यापेक्षा, शेतकर्यावर कोणताही कर नसल्याने, सर्व शेतकर्यांच्या खात्यावर पैसा जमा केल्यास, अडचणीतील शेतीला आणि शेतकर्याला त्याचा फार मोठा हातभार लागेल असे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.