Friday, April 25, 2025
Homeठळक घडामोडीमहाराष्ट्रात सातार्‍याला एक नंबरचे शहर बनवणार सौ. वेदांतिकाराजे भोसले

महाराष्ट्रात सातार्‍याला एक नंबरचे शहर बनवणार सौ. वेदांतिकाराजे भोसले

फसव्या अपप्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन
सातारा : सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आणि समाजाचे आरोग्य जपण्यासाठीच कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून मी काम सुरु केले होते. त्यावेळी मी राजघराण्यातील आहे मग, झाडू कशाला हातात घेता? असा प्रश्‍न कोणीही विचारला नाही. उलट आमच्या ग्रुपमध्ये लोकसहभाग वाढला आणि कर्तव्य ग्रुपच्या माध्यमातून समाजकार्याचे एक पर्व सुरु झाले. आज या ग्रुपच्या माध्यमातूनच मी घराघरात पोहचले आहे. माझे कार्य सर्व सातारकरांना माहिती आहे. पालिकेसाठी एक सक्षम आणि समाजहित जाणणारा नगराध्यक्ष पाहिजे. केवळ याच निकषासाठी मी निवडणूक लढवत आहे. महाराष्ट्रात असं एक सुंदर शहर आहे ज्याचे नाव सातारा आहे, असे लोक अभिमानाने म्हणतील, असा सातारा मला घडवायचा आहे. त्यासाठी फक्त एक संधी द्या, असे भावनीक आवाहन नगरविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
राधिका संकुल येथे नगरविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात सौ. वेदांतिकाराजे भोसले बोलत होत्या. यावेळी श्रीमंत सौ. ओजस्वीताराजे गायकवाड, राष्ट्रवादीच्या सौ. संगिता देशमुख, सौ. जयश्री पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. कांचन साळुंखे, माजी नगरसेविका सौ. माधुरी भोसले यांच्यासह नगरविकास आघाडीचे महिला उमेदवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या, आम्हाला काम महत्वाचे आहे. माझ्या कामाची सुरुवातच महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरु केली. महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिल्यानंतर मी कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कामे करतानाच लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी मोफत सर्वरोगतपासणी शिबीरे. मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया, मोफत जयपूर फूट वाटत (कृत्रीम हात व पाय), रक्तदान शिबीरे अशा माध्यमातून मानवाचे तर, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, प्लॅस्टीक निर्मुलन आदी उपक्रम राबवून आमच्या ग्रपुचे निसर्गाचे आरोग्य जपण्यासाठी अविरतपणे काम सुरु आहे. स्वच्छता मोहिम राबवून आम्ही स्वच्छ, सुंदर सातारा शहराच्या निर्मीतीसाठी कार्यरत आहोत. याच उपक्रमांमुळे मी घराघरात पोहचले आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून मला चांगले काम करुन स्वच्छ, सुंदर, सुरक्षित सातारा शहर निर्माण करायचे आहे. ज्यांनी काही काम केले नाही ते फक्त आरोपच करणार. आम्हाला आरोपात नाही तर, सातारकरांच्या समस्या सोडवण्यात रस आहे. कल्पक, अभ्यासपुर्ण आणि नियोजनबध्द सातारा शहराचा विकास करण्यासाठी नगरविकास आघाडीची टीम सज्ज झाली आहे. सातारकरांच्या प्रत्यक्ष सहभागातून पालिकेचा कारभारा पारदर्शक आणि लोकाभिमुख चालवून सातारा शहराचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी केवळ मलाच नाही तर माझ्या पुर्ण टीमला बहुमत देण्याची गरज आहे. शहरात सर्वप्रकारच्या मुलभुत सोयी सुविधा पुरवणे आणि याव्यतिरिक्त शहर कचरामुक़्त स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित करण्यासाठी नगरविकास आघाडी प्राधान्य देणार आहे. शहराच्या सर्वांगिण विकासासाठी नगरविकास आघाडी हा एकमेव पर्याय असून सातारकरांनी फक्त एकदा विश्‍वास टाकावा. सातारकरांना अभिमान वाटेल, अशे साजेशे काम करुन दाखवू, असे सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या. प्रत्येक प्रभागात वार्ड कमिटीची स्थापना करुन दर सहा महिन्यातून एकदा नगरपालिका आपल्या दारी हा उपक्रम राबवणार आहे. या उपक्रमातून प्रभागातील नागरिकांच्या सुचनानुसार प्रभागातील समस्या सोडवणे आणि विकास साधण्यात येणार आहे. सुसज्ज आणि सुरक्षित पार्किंग व्यवस्था, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे, नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी ऑनलाईन दाखले देण्याची सुविधा, घनकचरा प्रकल्प उभारणी,  सातारा शहराच्या उत्पन्नवाढीसाठी आणि उपनगरांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी हद्दवाढ करणार. कास धरण उंची वाढवण्याचे काम मार्गी लावणार आहोत. अपंगांसाठी स्वतंत्र शॉपींग सेंटर, महिला बचत गटांसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी मिनी तुळसीबाग अशा अनेक जनहिताच्या आणि सातारा शहराच्या विकासाच्या योजना आणि उपक्रम आम्ही राबवणार आहोत.
आम्ही काम केले आहे आणि आम्हीच काम करु शकतो, हे सातारकर ओळखतात. एक चांगला विचार घेवून आम्ही निवडणूकीला सामोरे जात आहे. आमदार, खासदार राजघराण्यातील चालतो मग, राजघराण्यातील सून नगराध्यक्ष म्हणून का चालत नाही? नगराध्यक्षपदासाठी सक्षमपणे चांगले काम करण्याची क्षमता असणे, हाच निकष असला पाहिजे. सर्व प्रकाराच्या सोयी सुविधा, विविध जनकल्याणकारी योजना, उपक्रम यासह पर्यावरण रक्षण आणि निसर्गसंवर्धन करण्यासाठी नगविकास आघाडी सकारात्मक उपाययोजना राबवणार आहे. मतदार राजाने आपल्या शहराचे हित ओळखून विचारपुर्वक मतदान करावे. फक्त एकदा नगरविकास आघाडीला बहुमत देवून पालिकेची सत्ता सोपवा. कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता फक्त काठी, काठी आणि काठीलाच मतदान करुन माझी टीम पालिकेत पाठवा. आम्ही पदासाठी नाही तर, सातारकरांचे सेवक म्हणून काम करु आणि सातारकरांचा विश्‍वास दर्जेदार काम करुन सार्थ ठरवू, असा शब्द सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी दिला.
यावेळी सौ. माधुरी भोसले, सौ. कांचन साळुंखे, सौ. वर्षा आतार, सौ. सुजाता घोरपडे, मुस्लीम महिला ओबीसी संघटनेच्या अध्यक्षा हवाबी बागवान आदी महिलांनी मनोगत व्यक्त केले. सौ. सविता कारंजकर यांनी सुत्रसंचालन करुन आभार मानले. मेळाव्यास सातारा शहरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular