सातारा : दिवसाला 35 ते 40 कि.मी.ची पायपीट केवळ तीन तास झोप अन् 40 उमेदवारांच्या प्रचारासाठी सातार्यात दिवसभर वणवण, सातारा विकास आघाडीचे स्टार प्रचारक खा. उदयनराजे भोसले हे काय रसायन आहे, हे पुन्हा एकदा शनिवारी गांधी मैदानाने अनुभवले. खास बच्चन स्टाईल डॉयलॉग पुढचा आमदार तुम्हीच ठरवा, सातारकरांच्या काळजाला हात घालणारा भावनिक संवाद आणि मनोमिलनाचा खरा अर्थ उलगडून सांगताना खासदारांनी तरूण तडफदार संयमी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा चांगलाच समाचार घेतला. सातारा विकास आघाडीच्या गांधी मैदानावरील येथील सांगता सभेत प्रचाराच्या तोफा थंडावल्या. उदयनराजे यांनी खास नेहमीच्या स्टाईलमध्ये तुफान बॅटींग केली. होय, मी दरोडेखोर आहे, पण मी सातारकरांच्या मनाला लुटले आहे, मी त्यांच्या मनाचा राजा आहे असे सांगत उदयनराजेंनी सातारकरांना जिंकून घेतलेच, शिवाय सातारा विकास आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे रहा, असे भावनिक सादही घातली.
नगर विकास आघाडीच्या सांगता सभेनंतर सातारा विकास आघाडीचे सर्वेसर्वा खा. उदयनराजे भोसले गांधी मैदानावर सांगता सभेत काय बोलणार, याची विशेष उत्सुकता होती, त्यामुळे गांधी मैदान प्रचंड गर्दीने फुलून गेले होते. चांदनी चौकापासून ते सोमन सभागृहाच्या कोपर्यापर्यंत माणसांच्या खच्चाखच गर्दीमुळे पाय ठेवायलासुध्दा जागा नव्हती. उदयनराजे यांनी 6.45 वा. नेहमीच्या स्टाईलने स्टेजवर एंट्री मारताच प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. पुन्हा एकदा सातारकरांना विकासाची कमीटमेंट करत, सर्व सामान्य उमेदवार तुम्हीच ठरवा. असे सांगत राजेंनी सभेचा नुर पकडायला सुरूवात केली. सयंमी व तडफदार आमदारांनी आमच्यावर टक्केवारीचा आरोप केला आहे.
टक्केवारी घ्यायला मी काय पाकीट मार आहे, असे बोलत उदयनराजे नावाची तोफ धडधडू लागली. ते पुढे म्हणाले, टक्केवारीची सवय, ज्यांना आहे, त्यांनी दुसर्यावर आरोप करू नये, होय मी दरोडेखोर आहे, पण मी सातारकरांच्या मनाला लुटले आहे, त्यांना काय विकास आहे हे मी पुरेपर जाणतो. नगर विकास आघाडीची विराट सभा आणि सातारा विकास आघाडीची विराट सभा असा पॉज घेऊन उदयनराजेंनी कोपरखळी मारताच, टाळ्यांचा गजर झाला. मनोमिलन दोन वर्षापूर्वीच तुटले होते. खासदारकीच्या निवडणूकी दरम्यान ज्यावेळी आम्ही मुलाखतीसाठी गेलो होतो, तेव्हा आमदार साहेबांनी सातार्यातून रामराजे नाईक निंबाळकरांचे नाव सुचविले होते. तेव्हाच मनोमिलनावर फुली पडली. मात्र सातारकरांची असणारी बांधिलकी, म्हणून या गोष्टीची कधीच वाच्चता केली. मात्र आता वेळ आली आणि विषय निघाला म्हणून सांगितले. सातारा विकास आघाडीच्या मागे तुम्ही भक्कमपणे उभे रहा, विद्यमान आमदारांची तीनच वर्षे राहिली आहेत. पुढचा आमदार तुम्हीच ठरवा. नाहीतर मला ठरवावा लागले असे त्यांनी ठामपणे सांगताच टाळ्यांच्या कडकडाटांनी गांधी मैदान दणाणले. सातारा विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांची जोरदार शक्तीप्रदर्शने झाली.