सातारा: मीच कार्यक्षम, मीच योग्य अशी मी पणाची भावना जोपासून सामान्य महिलांना नावे ठेवणे कितपत योग्य आहे? सातार्याच्या महिलांना कमी लेखू नका त्या कर्तव्यदक्ष आहेतच व योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता ही त्यांच्यामध्ये आहे. ज्यास्त अहंकार स्वत:च्या व समाजाच्या आरोग्यासाठीही चांगला नसतो. त्यातून हुकूमशाही जन्माला येते. सातार्याच्या जनतेने हे अनुभवले आहे. हयाच हुकूमशाही प्रवृत्तीतून जनतेला गाढव म्हणण्यापर्यत मजल गेली आहे. अहंकार आणि साधेपणाचा न्यायनिवाडा या निवडणूकीत जनता करुन दाखवेल असा परखड इशारा सातारा विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.माधवी कदम यांनी दिला.
सातारा नगरपालिकेच्या प्रचारार्थ प्रभाग 1 व 2 मधील उमेदवार राजू भोसले, सीता हादगे, मुरलीधर भोसले, सौ. स्नेहा नलवडे, यांच्या प्रचारार्थ काढलेल्या पदयात्रेत त्या बोलत होत्या. त्यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची उपस्थिती होती.
नेत्याचा स्वभाव त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटत असतो. सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगरपालिकेत काम करीत असताना स्वच्छ, सुंदर व आरोग्य संपन्न सातारा घडविण्यासाठी परिश्रम घेतले. मात्र दुसरीकडे नविआच्या नगरसेवकांनी अहंकाराचे सातार्यातील जनतेला दर्शन घडविले. हे आपणास माहिती आहे. यांच्याच हेकेखोर व भ्रष्टाचारामुळे भुयारी गटारी योजनेला खीळ बसली तर उद्याने ओसाड व भकास झाली. खरे तर त्याचवेळी शहरात घडणार्या ह्या वाईट गोष्टींना त्यांनी पायबंद घालून शिस्त लावली असती तर स्वत:च्या कार्यक्षमतेची टिमकी वाजविण्याची वेळ आली नसती असे सांगून, त्या म्हणाल्या विरोधक आम्ही काही बोलण्या आधीच किंवा आरोप करण्या आधीच स्वत:वरच आरोप लावून ते खोडून काढण्याचा निरर्थक व केवीलवाणा प्रयत्न करीतआहेत. अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्याही आधीपासून दोघेही जण तालासूरात एका घरात दोन पदे कशासाठी याचे समर्थन अगदी हीरीरीने करीत होते. त्यासाठी दाखले कोणाचे देत होते, तर खडसे आणि मुंडे घराण्याचे. अहो तुम्हांला कोणी विचारलेच नाही, आरोप केले नाहीत मग अचानक एका घरातील दोन पदांबाबत खुलाशे कशासाठी ? खडसे, मुंंडेंना मध्ये का आणता? त्या पदांचे काय करायचे हे जनताच ठरवेल ना ! पण नाही. कोण जास्त चांगला खुलासा करतो, याची जणू दोघांमध्ये चुरस लागली होती. एक गोष्ट खरी आहे की, त्यांना जनतेचा आवाज चांगला समजतो. मात्र त्यावर नेहमीच थातूर मातूर कारणे देवून वेळ मारुन नेणे सोपे नाही, हे त्यांनी ध्यानात घेतले पाहिजे असे सौ. कदम म्हणाल्या. शेवटी एकच उदाहरण देते दिल्लीच्या निवडणूकीतही किरण बेदी वेगळयाच थाटात स्वत:च्या कार्यक्षमतेचा डांगोरा पिटत होत्या. जनतेने त्यांना स्वप्नातील दुनियेतून जागे करुन जमिनीवर आणले. खरे म्हणजे आपटले. हिलरिंचे काय झाले हेही ताजे उदाहरण आहे. त्यामुळे स्वत:च्या कार्यक्षमतेचा डंका वाजवून सातारकरच्या महिलांना व जनतेला हिणवू नये. असा इशारा देत या निवडणूकीत सातार्यात 40 प्लस 1 झाल्याशिवाय रहाणार नाही असा विश्वास व्यक्त केला. ही पदयात्रा पैंजन स्टाईल – सुरुबन हॉटेल – जूना आरटीओ देशमुख कॉलनी – भुरके कॉलनी – कुपर कॉलनी – भिमाबाई आंबेडकर चौक – करीअप्पा चौक – मिलिंद सोसायटी अशी काढण्यात आली. पदयात्रेला साविआच्या कार्यकर्त्यांचा व नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला अनेक ठिकाणी श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे व सौ. माधवी कदम तसेच नगरसेवकांचे औक्षण करुन व पुष्पहार घालून नागरिकांनी स्वागत केले.