सातारा : दिवसभरात कोत्याही उमेदवाराचा अर्ज दाखल न झाल्याने पालिकेची यंत्रणा अक्षरक्ष: बसून राहिली. येत्या दोन दिवसात आणि धनत्रयोदशीनंतर उमेदवारी अर्जांचा महापूर येण्याची चिन्हे आहेत. प्रांताधिकारी स्वाती देशमुख व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नीलप्रसाद चव्हाण यांच्यासह मुख्याधिकारी शंकरराव गोरे व 23 कर्मचार्यांची यंत्रणा सातारा पालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. सोमवारपासून उमेदवारांची नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सकाळी 11 वाजलेपासून सुरु झाली. पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात बरीचशी वर्दळ चालू होती. कोणा-कोणाचे अर्ज दाखल होणार याविषयी प्रचंड उत्सुकता होती. मात्र मनोमिलनाकडून दोन स्वतंत्र आघाड्यांच्या उमेदवारी याद्या जाहीर न झाल्याने अर्ज दाखल करण्याचा सोमवारचा पहिला दिवस निरंक ठरला.
कराडात सौरभ पाटील यांनी खाते उघडले
कराड : कराड पालिका निवडणुकीसाठी आज प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी मंगळवार पेठ येथील सौरभ अशोक पाटील यांनी रूक्मिणीनगर प्रभाग क्रमांक एक मधून सर्वसाधारण गटातून आपला उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी किशोर पवार यांच्याकडे दिला.
यावेळी सहाय्यक निवडणुक अधिकारी विनायक औंधकर, तहसीलदार राजेंद्र शेळके यांची उपस्थिती होती. पालिका निवडणुकीसाठी ऑनलाईनद्वारे अर्ज भरल्यानंतर त्याची छायांकित प्रत काढून त्यावर संबंधित निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे संबंधित सोळा विभागाकडून ना हरकत घेऊन दाखल करावयाचा आहे. अर्ज दाखल करण्याची वेळ ही सकाळी अकरा ते तीन अशी आहे. 29 ऑक्टोंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार आहे. तसेच 2 नोव्हेंबर रोजी प्राप्त उमेदवारी अर्जाची प्रभागनिहाय छाननी केली जाणार आहे.
कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी
एकच अर्ज दाखल
कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी सुनील संपतराव पवार यांनी प्रभाग क्र. 8 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.