* सातार्यात महिला खुल्या प्रवर्गामुळे नवी राजकीय समीकरणे * फलटण-म्हसवड-सातारा-पाचगणी खुल्या गटासाठी * कराड-वाई-महाबळेश्वर अनुसुचित महिला प्रवर्गासाठी आरक्षित
सातारा : राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यातच कोंडीत पकडण्यासाठी सत्ताधारी भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फार तर्हेचे प्रयत्न चालवले आहेत. बुधवारी मंत्रालयात राज्यातील 191 नगरपालिकांच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आले. ही आरक्षणे बर्यापैकी सातारा जिल्ह्यातील राजकारणाच्या पथ्यावर पडली आहेत. फलटण, म्हसवड, सातारा, रहिमतपूर व पाचगणी या पाच नगरपालिका खुल्या झाल्याने राष्ट्रवादीतल्या मातब्बरांच्या आकांक्षांना धुमारे फुटले आहेत. तर कराड, वाई, महाबळेश्वर या तीन नगरपालिका अनुसुचित महिला वर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. महाबळेश्वरमध्ये काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असे घमासाण असताना महिला आरक्षणाने भल्याभल्यांचे पत्ते कट झाले आहेत. तर म्हसवडमध्ये आमदार जयकुमार गोरे यांना नशीबाने साथ दिली आहे.
भाजपनेही सातारा जिल्ह्याच्या राजकारणात फारसा सेटबॅक बसणार नाही या हेतुनेच सावध पावले टाकली आहेत. वाई व कराड वगळता सातारा, फलटण व पाचगणी, रहिमतपूर या चार नगरपालिका खुल्या झाल्याने राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा पक्षीय संघर्ष पहिल्यांदाच चिन्हांवर पाहायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्यात तब्बल 15 वर्षांनंतर थेट नगराध्यक्ष निवड येत्या डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील 25 लाख नागरिकांपैकी तीन चतुर्थअंश मतदार निवडुन देणार आहेत. द्विसदस्यीय प्रभाग रचना व थेट नगराध्यक्ष निवड यामुळे मतदारांना दोन मतदान करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
आरक्षणाच्या रचनेत कोणताही तोटा न होता. नगराध्यक्ष पद खुले अथवा आरक्षित कसे राहिल यावरच बरेचसे जिल्ह्याचे राजकारण अवलंबून आले आहे. बुधवारी मंत्रालयात 195 नगरपालिकांची जी आरक्षणे निघाली. त्या आरक्षणांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होते. त्यांची मुदत डिसेंबर 2016 ते फेबु्रवारी 2017 या दरम्यान संपत आहे. राज्यात नव्यानेच 19 नगरपालिका व 40 नगरपंचायतींची निर्मिती करण्यात आली. सातारा जिल्ह्यात मेढा, पाटण, वडुज, खंडाळा व दहिवडी या पाच नगरपंचायतींमध्ये पाटण व दहिवडी ओबीसी महिला, वडूज व खंडाळा ओबीसी पुरुष, व मेढा नगरपंचायत अनुसुचित महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत. नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैस्कर यांनी या आरक्षण सोडतींची माहिती दिली. सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला चुरशीच्या लढतीचा कौल मिळाला आहे. अ वर्ग असणार्या सातारा नगरपालिकेत खुल्या प्रवर्गामुळे मनोमिलनाला प्रचंड लढत मिळणार आहे. भाजपालाही या आरक्षणामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र फलटणमध्ये रामराजे गटाची सत्ता मजबुत असल्याने भाजपला मोठी राजकीय गोळाबेरीज करावी लागणार आहे. या प्रक्रियेत स्व. चिमणराव कदम यांचे समर्थक कशी भूमिका घेतात, भाजपमध्ये नुकतेच प्रवेेश केलेले चिमणराव कदम यांचे चिरंजीव सह्याद्री कदम राजे गटाला कशी टक्कर देतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. वाई कराड व महाबळेश्वर या तीनही नगरपालिकांवर राष्ट्रवादीचीच पकड आहे. मात्र मागास स्त्री प्रवर्गांमुळे राजकीय मातब्बरांना आपले आकाक्षांना मुरड घालावी लागली आहे. पाटण वडुज दहिवडी खंडाळा या चार नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा निकराचा सामना आहे. खंडाळा तालुक्यात शिवसेनेची ताकद बर्यापैकी असल्याने भाजपाला सेना साथ देणार समोरासमोर लढत होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. पाटणमध्ये देसाई विरुद्ध पाटणकर हा पारंपारिक गटच आमने-सामने भिडणार आहे. वडुजमध्ये आमदार येळगावकर यांच्या रुपाने भाजपची पारंपारिक ताकद असल्याने भाजप राष्ट्रवादीला टक्कर देऊ शकेल अशी राजकीय गणिते मांडली जाऊ लागली आहेत.
नगरपालिका आरक्षणे
सातारा सर्वसाधारण खुला महिला
कराड अनुसुचित महिला
वाई अनुसुचित महिला
पाचगणी सर्वसाधारण खुला
महाबळेश्वर अनुसुचित महिला
रहिमतपूर सर्वसाधारण महिला
म्हसवड सर्वसाधारण खुला
फलटण सर्वसाधारण खुला
नगरपंचायत आरक्षणे
पाटण इतर मागास प्रवर्ग महिला
वडूज इतर मागास प्रवर्ग पुरुष
खंडाळा इतर मागास प्रवर्ग
दहिवडी ओबीसी महिला
मेढा अनुसुचित महिला