सातार: संरक्षण राज्य मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर तोतया पत्रकाराने सैनिक स्कूलच्या आवारात एका पत्रकाराला मारहाण करत दहशत माजविली. त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षापासून वरिष्ठ अधिकार्यांच्या नावावर पोलिस अधिकारी, कर्मचारी व पत्रकारांवर होत असलेल्या दहशतवादाचा कायमचा बीमोड करण्याची मागणी पत्रकार संघटनांच्या पदाधिकार्यांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे केली.
पियुष ऊर्फ रोहित चित्तरंजन भुतकर (रा. आझाद नगर, शाहूपुरी) असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सोमवारी (ता. 26) शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. तरीही त्याचे संबंधित महिलेला गुन्हा मागे घेण्यासाठी दहशत दाखविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महिलेने पोलिस अधीक्षकांकडे संरक्षणाचीही मागणी केलेली आहे. तरीही तो बिनधास्तपणे शहरात वावरत आहे.
आज संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज सैनिक स्कूलमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी शहरातील विविध वृत्तपत्रे व वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी गेले होते. तेथे भुतकरही आला होता. पत्रकारपरिषद संपल्यानंतर वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आपल्या कार्यालयाकडे निघाले होते. या वेळी त्याने पत्रकार संघाच्या एका प्रतिनिधीला अडविले. तू माझ्याबाबत बातमी का छापली, माझ्याकडे रागाने का बघतोस असे म्हणून त्या प्रतिनिधीला मारहाण करण्यास सुरवात केली. मारहाण होत असल्याचे पाहून इतर पत्रकार व संरक्षण मंत्र्यांच्या बंदोबस्ताला असलेले पोलिसांनी मध्ये पडून त्याला थांबविले. मात्र, संरक्षण राज्य मंत्री उपस्थित असताना एका तोतयाने माजविलेल्या दहशतीमुळे सर्वजणच अवाक झाले.
दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पवार, जीवनधर चव्हाण, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, दीपक प्रभावळकर, प्रवीण जाधव, इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष सचिन जाधव, ओंकार कदम यांच्यासह प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या पत्रकारांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेतली. संबंधित पत्रकार कोणत्याही पत्रकाराचा सदस्य नाही. पत्रकारितेच्या नावावर वेगळेच धंदे सुरू असतात. सातार्यात गेल्या काही वर्षापासून पोलिस व पत्रकारांवर चाललेला या दहशतवादाचा बीमोड करण्याची मागणी त्यांनी केली. देशात व राज्यात महिलांच्या सुरक्षतेवरून एवढा गोंधळ चालू असताना विनयभंगातील संशयित खुलेआम कसा फिरतो, शासकीय अधिकारी त्याला आपल्या गाडीत कसे नेतात, याचा समाजावर किती गंभीर परिणाम होतो असेही पदाधिकार्यांनी अधीक्षकांना विचारले. तसेच संबंधित व्यक्ती पत्रकार असल्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. तरही संरक्षण राज्य मंत्र्यांच्या पत्रकारपरिषदेत तो कसा उपस्थित राहिला, अशा प्रवृत्ती काहीही करू शकतात. त्यामुळे कोण अधिकारी त्याला पाठीशी घालतात याचीही चौकशी करण्याची पदाधिकार्यांनी केली. दरम्यान, मारहाण करून त्यानेच आधी शहर पोलिस ठाण्यात जाऊन अदखलपात्र गुन्हा नोंदविला. मारहाण झालेल्या पत्रकाराने जिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भुतकरवर गुन्हा दाखल झाला आहे.