फलटण नगरपालिकेतील सत्ताधारी
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा आरोप
फलटण : फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी असलेले प्रांताधिकारी व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी असलेले मुख्याधिकारी हे सत्ताधारी राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्यकर्ते असल्याप्रमाणेच कामकाज करीत असल्याने सर्व विरोधकांतर्फे आम्ही त्याचा जाहीर निषेध करीत असून खरोखरच पारदर्शी निवडणुका पार पाडायच्या असेल तर ताबडतोब निवडणुक आयोग व जिल्हाधिकारी यांनी त्या दोघांना बडतर्फ करण्याची मागणी कृष्णा खोरे मंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
आगामी निवडणुकीसाठी शहराच्या मलठण भागातील 325 मतदारांचा प्रभाग तीन मधुन पाच मध्ये समावेश करण्यात आल्याने व हा समावेश कोणाचीही हरकत किंवा तक्रार नसताना मुख्याधिकार्यांनी केल्याने संतप्त सर्व विरोधकांनी काल प्रांत व मुख्याधिकार्यांना धारेवर धरीत दोघांनीही निवडणुक प्रक्रियेतुन बाजुला होण्याची मागणी केली होती. दिवसभर गोंधळ व तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना रात्री विरोधकांनी सातारा येथे जिल्हाधिकार्यांची भेट घेवून मतदार यादीतील घोळ व प्रांत व मुख्याधिकार्यांना बडतर्फीची मागणी केली होती. आज पुन्हा सर्व विरोधक नगरपालिकेतून आले मात्र नेहमीप्रमाणे कामकाज चालु असल्याने व वरिष्ठ अधिकार्यांनी काहीच दखल न घेतल्याने विरोधकांनी नगरपालिकेच्या दारातच पत्रकार परिषद घेवुन प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, माजी नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर, अॅड. नरसिंह निकम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विराज खराडे, तालुका प्रमुख विकास राऊत, भाजपा तालुकाध्यक्ष सुशांत निंबाळकर, स्वाभिमानीचे धनंजय महामुलकर, महेंद्र बेडके, अशोकराव जाधव, मितेश खराडे आदी उपस्थित होते.प्रांत व मुख्याधिकारी नगरपालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्यकर्ते असल्याप्रमाणेच कारभार करीत असुन निवडणुकीत त्यांच्यामुळे पारदर्शीपणा येणार नाही. विरोधकांचे अर्ज बाद करमे, विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार त्यांच्याकडुन होवु शकतात. आम्ही प्रांत व मुख्याधिकार्यांच्या विरोधात उपोषणाला बसणार असल्याने उपोषणाची परवानगी मागितली मात्र ती जाणुनबुजुन दिली जात नसुन फलटणमध्ये कायद्याचे राज्य आहे का नाही हे कळेनासे झाले आहे. आमच्या पद्धतीने आम्ही यापुढे दोघांच्याविरोधात लढा चालुच ठेवणार आहे. सर्व विरोधक आता अन्यायाविरोधात एकवट्याने असुन अधिकार्यांना घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या नेतेमंडळीच्या घरी पाणी भरत असल्यासारखे त्यांचे वर्तन असल्याने दोघांची योग्य ती चौकशी होवून त्यांना तातडीने निलंबित करावे, आमच्या तक्रारीती अद्यापही निवडणुक आयोगाने दखल घेतली नाही तर न्यायालयात जावू असा इशारा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला.