सातारा शहराचा विकास अन् घराणेशाहीला विरोध
रासपला तीन जागा
शिवसेना व रिपाईशी आघाडीची चर्चा सुरू
सातारा : सातारा जिल्ह्यातील एकमेव अवर्ग नगर पालिका असणार्या सातारा पालिकेसाठी भारतीय जनता पार्टीने बुधवारी 18 उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली. दिवसभर शहरामध्ये झालेल्या नाट्यमय घडामोडीत राष्ट्रीय समाज पक्षाशी चर्चा करून त्यांना शहरात तीन जागा देण्यात आल्या. वीस प्रभागातून भाजपा 40 उमेदवारांची यादी जाहीर करणार असून पैकी पहिल्या 18 उमेदवारांची यादी पत्रकार परिषद घेऊन प्रसार माध्यमांना देण्यात आली. या घडामोडीची माहिती भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य दीपक पवार यांनी दिली. भाजपने स्वबळाची भाषा करताना युतीचे सर्व पर्याय खुले ठेवले असून शिवसेना व रिपाई यांना पुढील 24 तासाची डेडलाईन दिली आहे. तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून सुवर्णाताई पाटील यांच्या नावाची घोषणा यावेळी करण्यात आली. सातारा शहराचा संपुर्ण विकास व येथील घराणेशाहीला विरोध असा अजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. सर्व उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे दाखल करण्यात येणार आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी सरचिटणीस दत्ताजी थोरात, शहराध्यक्ष सुनिल काळेकर, सुवर्णाताई पाटील यावेळी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना दीपक पवार पुढे म्हणाले, सातार्यात घराणेशाही असल्यामुळे सातारा शहराचा विकास झाला नाही. पायाभूत सुविधांसह अनेक प्रकल्प योग्य नियोजना अभावी रखडून पडलेले आहेत. 24 बाय 7 पाणी पुरवठा योजना, एलईडी प्रकल्प, तसेच घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, अशा विविध विकास कामांना नगर सेवकांच्या नाकर्तेपणामुळे खिळ बसली. याला सातार्याची घराणेशाही कारणीभूत आहे. पवार यांच्या टीकेचा रोख हा थेट आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर होता. ते म्हणाले, स्व. अभयसिंहराजे भोसले हे अनेक वर्षे राज्याच्या सत्तेमध्ये होते. तरीसुध्दा शहराचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिले. याचा फटका सातारकरांना बसला आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ आली आहे. शिवेंद्रसिंहराजे यांच्या घराण्यात अनेक वर्षे सत्ता आहे आणि आता त्यांच्या पत्नी वेदांतिकाराजे यांची नगराध्यक्ष पदासाठी चर्चा आहे. म्हणजे पुन्हा घराणेशाही, सातारा शहराच्या नगराध्यक्ष पदासाठी दुसरी सक्षम सामान्य परिवारातील महिला नाही का? याच घराणेशाहील आमचा विरोध असून ती मोडीत काढण्याचा आमचा पण आहे. सातारा शहराचा संपुर्ण विकास व घराणेशाहीला विरोध, हाच अजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत असे ते म्हणाले. घराणेशाहीच्या चौकटीत खा. उदयनराजे भोसले येत नाहीत का? या प्रश्नावर दीपक पवार यांनी त्यांचा नामोल्लेख टाळला. मला आमदारांच्या घराणेशाहीला विरोध आहे असे ते स्पष्ट म्हणाले.
साविआत काम केले, पण भाजपची कार्यकर्ती म्हणूनच
दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये नगरसेविका व भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सुवर्णाताई पाटील यांची नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून घोेषणा केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, सातारा शहरात गेल्या पाच वर्षात नागरिकांच्या पैशाने जी उधळपट्टी झाली, ती रोखण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्या माध्यमातून सातारा शहराचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यावर आमचा भर असून त्याची आखणी आमच्या कडून सुरू झाली आहे. सातारा शहराच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात येत असून या निवडणूकीत भाजप संपुर्ण ताकदीने आमच्या मागे उभा आहे. सातारा विकास आघाडीशी असलेल्या सलग्नतेवरून त्यांना प्रश्न विचारले असता, सुवर्णाताई म्हणाल्या सातारा विकास आघाडीमध्ये मी पाच वर्षे जरी काम केले, तरी मी भाजप सदस्य याच नात्याने सक्रीय राहिले. सभागृहात अनेक प्रलंबित प्रश्नांवर मी सातत्याने आवाज उठविला आहे. मात्र नगर पालिकेत महिला नगर सेवकांना अपवाद वगळता कमी किंमत देण्यात आली. गेल्या पाच वर्षात हेच चित्र सातत्याने कायम राहिले आहे. ज्यांची चलती आहे, त्यांचीच कामे होतात. आणि इतर महिला नगर सेवकांना मात्र आम्ही कामे करवून घेण्यासाठी प्रशासनाचे उंबरे झिजवावे लागतात, हे चित्र मी बदलणार आहे.
भाजपाने जाहिर केलेले उमेदवार
प्रभाग क्रं. 1 प्रदीप मोरे, 2अ – मिलींद काकडे, 3अ – दीपक बर्गे, 4 – 5अ- योगेश जाधव, 7 अ-अशोक धडचिरे , ब- जयश्री काळेकर, 8 अ- धीरज घाडगे, 9 अ- विक्रम बोराटे, 11 अ – आप्पा कोरे, 14अ- महेंद्र कदम, ब – सरोज पवार, 15 अ- सागर पावशे, 16 अ – धनंजय जांभळे, ब- प्राची शहाणे,17 अ- विजय काटवटे, ब- सिध्दी पवार, 18 अ- संजय लेवे, व प्रभाग क्रं. 19 व 20 मध्ये राष्ट्री समाज पक्षासाठी तीन जागा आरक्षित.