सातारा : नगरसेविका दिपाली गोडसे यांच्या पाठपूराव्यामुळे सत्यात उतरत असलेले यादोगोपाळ पेठेतील (स्व) श्री. छ. प्रतापसिंह महाराज उर्फ दादामहाराज उद्यान सातार्याच्या लौकिकात भर घालेल, असा विश्वास खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
यादोगोपाळ पेठेत, तालिमखान्यासमोर पालिकेच्या वतीने श्री. छ. प्रतापसिंह महाराज उर्फ दादामहाराज उद्यान उभारण्यात येत आहे. त्याचे भूमीपूजन नक्षत्र च्या संस्थापिका श्री. छ. दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी आमदार श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले, नगराध्यक्ष विजय बडेकर, पालिकेचे उपाध्यक्ष जयवंत भोसले, नगरसेविका दिपाली गोडसे आदी प्रमुख उपस्थित होते.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, अनेक वर्षापासून याठिकाणी उद्यानासाठी आरक्षीत जागा विकासाविना पडून होती. दिपाली गोडसे यांनी लक्ष घालून पाठपूरावा सुरु केला. त्याला यशही आले. त्यांच्यामुळेच आज याठिकाणी बगिचाचा विकास होत आहे. एखाद्या कामाचा किती पाठपूरावा करावा, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून सौ. गोडसे यांच्याकडे पाहता येईल. नाईन डी शो पाहण्याची सुविधा या उद्यानामुळे सातारा शहरच नव्हे तर जिल्हावासियांना उपलब्ध होणार आहे. मुंबईतील तारांगणच्या धर्तीवर छोटेखानी तारांगण, खुला रंगमंच, सायकल ट्रॅक, मुलांसाठी खेळणी अशी विरंगुळ्याची बरीच साधने सातारकरांसाठी उपलब्ध होणार आहेत. येत्या वर्षभरात नियोजित उद्यान सातारकरांच्या सेवेत रुजू होईल. संबंधितांनी उद्यानाचे काम वेळेत आणि पुरेसा दर्जा राखून करावे, अशा सूचना आपण अधिकार्यांना दिल्या असल्याचे उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
श्री. छ. दमयंतीराजे भोसले म्हणाल्या, घरात लहान मुलांना आपण जास्त टिव्ही पाहून नकोस, सारखा मोबाईलवर खेळू नकोस अशा सूचना करत असतो. परंतु मुलांना करमणुकीसाठी चांगले पर्यायच आपण देत नाही. सातारकरांची ही गरज ओळखून दिपाली गोडसे यांनी एका चांगल्या उद्यानाच्या निर्मितीचे काम हाती घेतले आहे. त्यांची कामातील तन्मयता, चिकाटी आणि प्रयत्नात सातत्य या गुणांचे कौतूक करावे तेवढे थोडे आहे.
प्रतापसिंह महाराज उद्यान सातार्याच्या लौकिकात भर घालेल : खा. छ. उदयनराजे
RELATED ARTICLES