सर्व पक्षीय सदस्यांना मोट बांधण्याचा प्रयत्न
सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये झालेली धराधरी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला भलतीच झोंबली आहे. मात्र फार ताणून तुटू नये यासाठी राष्ट्रवादीने सावध पावले उचलली आहेत. झाले गेले विसरुन जावे या न्यायाने जिल्हा परिषद सदस्याने विशेषत: कृषी विभागाने सर्व मान्यतेनंतर अभ्यास दौरा या गोंडस नावाखाली सिक्कीम दौर्याचे आयोजन केले असून तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवण्यात आल्याचे समजते. येत्या डिसेंबरमध्ये हा दौर्या होणार असल्याचे वृत्त समोर येत असून बर्याच सदस्यांनी या दौर्यात स्वारस्य दाखवले आहे.
सिक्कीमच्या थंड वातावरणात सदस्यांची डोकी थंड होवून नव्या दम्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ते सामोरे जातील या हेतूने हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणात सत्ताधारी विरुध्द उदयनराजे गट असा सरळ सामना गेल्या काही महिन्यांपासून रंगतो आहे. त्यात कृषी सभापती शिवाजी शिंदे हे नाराजी नाट्याचे केंद्रबिंदू असल्याने त्याचे तीव्र पडसाद काही दिवसापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत उमटले होते. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी शिंदे यांना एकेरी शब्द वापरात अगदी धक्कीबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या गोंधळाचे पडसाद थेट बारामतीपर्यंत उमटले. खा. उदयनराजे भोसले यांनी सुध्दा याची गांभीर्याने दखल घेतली. मात्र या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने विशेषत: झेडपी सदस्यांनीच फार प्रकरण न ताणता या कटू स्मृती मागे टाकण्याचे धोरण घेतले आहे. हवा बदल म्हणून चक्क सिक्कीम दौर्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे आणि तो तत्काळ उचलून धरत लगेच सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
सातार्याचे माजी खासदार श्रीनिवास पाटील हे सध्या सिक्कीमचे राज्यपाल आहेत. पाटील यांनी आपल्या कामगिरीने अल्पावधीत तेथे ठसा उमटवला आहे. राज्यपाल भवन सर्वसामान्यांच्या अडीअडचणींसाठी नेहमीच खुले ठेवले जात आहे. हा खुलेपणा राष्ट्रवादी सदस्यांना भावला असून भांडणाने पिचलेली डोके शांत करण्यासाठी कृषी विभागाचे पथक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तिकडे कसे रवाना होईल याची प्राथमिक पातळीवर हालचाल सुरु झाली आहे. अॅग्रो टुरिझम हा सिक्कीममध्ये आर्थिक उत्पादनाचा विशेष भाग मानला जातो. ही संकल्पना श्रीनिवास पाटलांनीच रुजवली आहे. सातारा जिल्ह्यातही अॅग्रो टुरिझमचा प्रयोग यशस्वी झाला आहे. हा समान संदर्भ जोडून सातारा-सिक्कीम हा सेतूबंध पक्का करण्यासाठी जिल्हा परिषदेचे नाराज व विरोधी गट एकत्र कसे येतील यासाठी अभ्यास सहलीचे नियोजन आहे.