सातारा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपूर्ण समाजाचे संघटन करायचे आहे. जोपर्यंत संपूर्ण समाज आणि संघ एकरुप होत नाही, तोपर्यंत संघाचे काम सुरुच राहणार असल्याचे प्रतिपादन संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक सुरेश जाधव यांनी केले.

येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या येथील शाखेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शस्त्रपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अजित मुथा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हा संघ चालक डॉ. सुभाष दर्भे, जिल्हा सह संघ चालक जयवंत सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
जाधव म्हणाले, धर्म जागरण, कुटुंब प्रबोधनासह वेगवेगळ्या माध्यमातून संघाच्या स्वयंंसेवकांचे कार्य सुरु आहे. जाणुनबुसजून काही लोक समाजाला संघापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भातील वास्तव आज समाजाला कळले आहे. त्यामुळे लोक मोठ्या संख्येने संघात यायला उत्सुक आहेत. परिणामी संघ स्वयंसेवकांची जबाबदारी वाढली आहे. त्यांनी आता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावे. संघाच्या विविध कार्य विभागांच्या माध्यमातून समाजासाठी योगदान द्यावे. विजयाच्या दृष्टीने सीमोल्लंंघन झाले पाहिजे.
अजित मुथा म्हणाले, चुकीच्या माहिती पसरविल्यामुळे लोक संघापासून दूर जात आहेत. दुसर्यासाठी काही तरी करावे हे संघात शिकविले जाते. जिथे सरकारी यंत्रणा वेळेत पोहचत नाही, तिथे संघाचे कार्यकर्ते पोहचून लोकांना मदत करतात. संघात मुलांवर संस्कार केले जातात.
डॉ. सुभाष दर्भे यांनी आभार मानले त्यानंतर कार्यक्रमस्थळी प्रार्थना होवून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी स्वयंसेवकांसह मान्यवर नागरिक उपस्थित होते. दरम्यान, विजयादशमी उत्सवानिमित्त संघाच्या बाल व पुरुष स्वयंसेवकांनी सातार्यात संचलन केले. न्यू इंग्लिश स्कूल चौक, मुनोत चौक, मोती चौक, तांदूळ आळी मार्गे फुटका तलाव येथून पुन्हा न्यू इंग्लिश स्कूल या दरम्यान हे संचलन झाले. त्यानंतर स्वयंसेवकांनी प्रात्यक्षिके सादर केली. संचालनात मुले व पुरुष असे अडीचशे स्वयंसेवक सहभागी झाले होते.