शिरगावमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सातारा : शहीद पोलीस काँस्टेबल विलास शिंदे यांच्या पार्थिवावर आज शिरगाव येथे 10 बंदुकींच्या हवेत तीन फैरी झाडून तसेच पोलीस बँन्ड पथकाच्यावतीने अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शिरगाव येथे पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.
शहीद पोलीस काँस्टेबल विलास शिंदे यांचे पार्थिव आज पहाटे शिरगाव येथील निवासस्थानी आणण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायतीनजीक अत्यंदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. याठिकाणी ग्रामस्थांनी अत्यंदर्शन घेतले. पोलीस बँन्ड पथकाच्यावतीने तसेच पोलीसांकडून याठिकाणी मानवंदना देण्यात आली. याठिकाणी तहसीलदार अतुल म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक दीपक हुंबरे, खंडेराव धरणे, वाई पंचायत समितीच्या सभापती उमा बुलुंगे, गट विकास अधिकारी दिपा बापट यांनी अत्यंदर्शन घेतले.
सकाळी 9.15 वाजता या ठिकाणाहून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. अमर रहे अमर रहे विलास शिंदे अमर रहे अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अत्यंसंस्काराच्या ठिकाणी पोहचली. या ठिकाणी काही काळ अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. येथे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. त्याचबरोबर प्रांताधिकारी अस्मिता मोरे, माजी खासदार लक्ष्मण पाटील, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महेश शिंदे, नंदकुमार घाडगे, अनिल शेंडे आदींसह उपस्थित अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ यांनीही अत्यंदर्शन घेतले.
पोलीसांच्या 10 जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर शहीद विलास शिंदे यांचा मुलगा दिपेश याच्या हस्ते अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी झालेल्या शोकसभेत जिल्हाधिकारी श्री. मुद्गल श्रद्धांजली वाहताना म्हणाले, सामान्य लोकांच्या रक्षणार्थ कर्तव्य बजावताना साताराच्या सुपुत्राने हौतात्म्य पत्कारले आहे. शासनाच्यावतीने मी शहीद विलास शिंदे यांना श्रद्धांजली वाहतो. शहीद शिंदे यांचे बलीदान राज्यासाठी, देशासाठी प्रेरणा देणारे आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पाटील म्हणाले, शहीद शिंदे यांचा आम्हांला सार्थ अभिमान आहे. त्यांनी पत्करलेले हौतात्म्य पोलीस दलाची शान वाढविणारे आहे. त्यांच्या बलीदानाने सातारा जिल्हा, वाई तालुका पवित्र झाला आहे. पोलीस दलातर्फे त्यांना सलाम. माजी खासदार लक्ष्मण पाटील, महेश शिंदे, प्रमोद शिंदे यांनीही यावेळी श्रद्धांजली वाहिली. यानंतर जिल्हाधिकारी श्री. मुद्गल, पोलीस अधीक्षक श्री. पाटील यांनी शहीद विलास शिंदे यांचे वडील विठ्ठल शिंदे, आई कलावती, पत्नी साधना, मुलगा दिपेश आणि मुलगी कल्याणी यांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. शासन सदैव आपल्या पाठीशी आहे, अशी ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली.