सातारा- विकासकामाच्या गप्पा मारण्यात नेहमीच मश्गूल राहिलेल्या खासदार साहेबांकडून गोखले हौदाची दुरुस्ती आणि सुशोभिकरणासाठी अद्यापही निधी उपलब्ध झाला नाही. लोकसहभागातून गोखले हौदाची दुरुस्ती आणि सुशोभिकरण करण्यासाठी नगर पालिकेने व्यंकटपुरा क्रीडा व सांस्कृतिक मंडळाला रितसर परवानगी दिली होती. त्यानुसार या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या सहकार्याने हौदाच्या सुशोभिकरणाचे काम सुरु केले. मात्र विघ्नसंतोषी आणि मग्रुर नगरसेवक आण्णा लेवे यांना हे बघवले नाही आणि त्यांनी हे काम बंद पाडले. या प्रकाराला खतपाणी घालून खासदारांनी आपली स्वत:ही करायचे नाही आणि दुसर्यालाही करु द्यायचे नाही, अशी वृत्ती अधोरेखित केली असून दुसर्यांकडून जनहितार्थ सुरु असलेल्या कामात तरी, मांजर बनून आडवे फिरू नका, असे टिकास्त्र आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोडले. दरम्यान, आपण नगरसेवक आहात. लोकांची सेवा करा. प्रभागाचा मालक बनू नका, असा सज्जड इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी साविआचे नगरसेवक आण्णा लेवे यांना दिला आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, खोटे बोलायचे तेही रेटून बोलायचे, अशी ख्याती प्राप्त असलेल्या आपल्या खासदारांनी पुर्ण बोलण्याची कधीही तसदी घेतली नाही. गोखले हौदाबाबत सुध्दा तीच परिस्थिती आहे. खासदार साहेबांनी 2012- 13 मध्ये गोखले हौदाच्या सुशोभिकरणाचा विषय पालिकेच्या स्थायी समितीमध्ये मंजूर केल्याचे तेच सांगत आहेत. यासाठी त्यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून 3 लाख रुपये खासदार निधी 2013 मध्ये दिल्याचे पत्रकबाजीतून सांगत आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. 2013 चे राहूद्याच, अद्यापपर्यंत गोखले हौदासाठी खासदार निधी मिळालाच नाही, हे दुर्देवाने सत्य आहे. मात्र ऐतिहासिक गोखले हौदाची दुरुस्ती आणि सुशोभिकरणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी कोणताही राजकीय भेदभाव न ठेवता व्यंकटपुरा पेठेतील व्यंकटपुरा क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने लोकसहभागातून गोखले हौदाची दुरुस्ती आणि सुशोभिकरण करण्यासाठी नगर पालिकेकडे रितसर परवानगी मागितली होती. यासंदर्भात नियोजन व विकास समितीने 2015 मध्ये पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदर विषय पाठवला. पालिका प्रशासनात अत्युच्च असलेल्या सर्वसाधारण सभेने दि. 6 ऑगस्ट 2015 रोजी सदर विषयाचा ठराव (क्र. 139) सर्वानुमते मंजूर केला. या ठरावाला अविनाश कदम हे सुचक होते तर, सातारा विकास आघाडीच्या नगरसेविका सुजाता गिरीगोसावी यांनी अनुमोदन दिले होते.
मंजूर ठरावात व्यंकटपुरा पेठेतील गोखले हौदाची दुरुस्ती व सुशोभिकरण लोकसहभागातून व्यंकटपुरा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ करणार असल्याने ऐतिहासिक महत्व वाढणार आहे. तरी, सदर मंडळास सुशोभिकरण व दुरुस्ती करण्यासाठी मंजूरी देण्यात येत असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. ठराव मंजूरीनंतर नगर पालिका प्रशासनाने दि. 1 जून 2016 रोजी तशा आशयाचे पत्रही व्यंकटपुरा क्रीडा व सांस्कृतिक मंडळाला दिले आहे. सदर पत्रात मंडळाने केलेल्या हौद दुरुस्ती व सुशोभिकरणाच्या मागणीला सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली असून मंजूरीनुसार मंडळामार्फत व्यंकटपुरा पेठ तसेच सभोवतालच्या नागरिकांना, बाळगोपाळांना आणि जेष्ठ नागरिकांच्या सार्वजनिक प्रयोजनार्थ गोखले हौदाची दुरुस्ती व सुशोभिकरण लोकसहभागातून करण्यास नगर पालिकेची काहीही हरकत नसल्याचे स्पष्पपणे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार मंडळाने दि. 9 डिसेंबर 2016 रोजी पालिकेच्या मुख्याधिकार्यांना पत्र देवून हौदाची दुरुस्ती आणि सुशोभिकरणाचे काम लोकसहभागातून सुरु करत असल्याचे कळवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. ही वस्तुस्थिती असताना आणि लोकसहभागातून हौदाच्या सुशोभिकरणाचे काम सुरु असताना सातारा विकास आघाडीचे नगरसेवक लेवे यांनी त्याठिकाणी जावून काम बंद पाडले. स्वत: जनहिताचे काम करायचे नाही आणि दुसरे कोणी करत असेल तर आडकाठी आणायची हाच त्यांच्या नेत्यांचा आदर्श लेवे यांनी घेतला असल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनेवरुन स्पष्ट होत आहे.
अविनाश कदम आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ऐतिहासीक वारसा जतन करण्यासाठी लोकसहभागातून एक आदर्श काम सुरु केले असताना लेवे सारख्या विघ्नसंतोषी आणि मग्रुर नगरसेवकाने ते काम बंद पाडले. नगरसेवक हा जनतेचा सेवक असतो, हेच लेवे विसरले असून संपुर्ण प्रभागाचे आपण मालक आहोत या अविर्भावात लेवे आहेत. हौदाच्या प्रकरणावरुन उलटा चोर कोतवाल को डाटे, अशी काहीशी परिस्थिती उदयनराजेंमुळे झाली आहे. हौदाच्या सुशोभिकरणासाठी पुढाकार घेणार्या अविनाश कदमांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार्या खासदारांनी सर्वसाधारण सभेत सदर ठरावाला अनुमोदक कोण आहे, हे पहावे आणि त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवावे, असा चिमटाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी काढला आहे. केवळ फुशारक्या आणि पोकळ बाता मारुन विकासकामाची स्वप्ने रंगवणार्या खासदारांना आता लोकसहभागाच्या कामाचेही श्रेय घ्यायचे आहे. मुह में राम और बगल मे छुरी असे व्यक्तीमत्व जपणार्यांनी दुसरे करत असतील त्या कामात तरी मांजर बनून आडवे जावू नये, असा जबरदस्त टोला आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकाद्वारे लगावला आहे.
बदलत्या भुमिकेचे अनुकरण हेच समाधान…
दरम्यान, गोखले हौदाच्या सुशोभिकरणाच्या प्रकरणावरुन नगरसेवक लेवे यांनी अविनाश कदम यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. जशास तसे उत्तर देण्याची भुमिका मी जाहीर केल्यानंतर माझे कार्यकर्तेही या भुमिकेचे अनुकरण करत आहेत. अविनाश कदम यांनी लेवे यांना मारहाण केली याचे मला मनस्वी समाधान आहे. त्यामुळे लेवे यांनी आपण नगरसेवक आहोत, मालक नाही हे लक्षात ठेवून भाषा निट वापरावी. अन्यथा कधीतरी त्यांचा समाचार घ्यावा लागेल, असा इशाराही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला असून कोणत्याही परिस्थितीत गोखले हौदाच्या सुशोभिकरणाचे काम पुर्णत्वास नेण्यासाठी व्यंकटपुरा क्रीडा व सांस्कृतिक मंडळास सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.