म्हसवड: येथील रथोत्सव हा यंदाच्या वर्षी पर्यायी बायपास रस्त्याच्या मार्गाने होणार असून श्रींच्या रथमार्गासंबंधी जी काही प्रशासनाची मदत लागेल ती संपूर्ण मदत केली जाईल. सर्व मानकर्यांनी व भाविकांनी आपली यात्रा शांततेत व मंगलमय वातावरणात पार पाडून गावचा नावलौकिक वाढवावा. तुमच्या काही यात्रेसंबंधी विविध अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी स्पष्ट केले.
येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रविवारी होणार्या रथोत्सवाच्या पाश्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील राजवाड्यात रथाच्या मार्गासंबंधी महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे, तहसीलदार सुरेखा माने नगराध्यक्ष भगतसिंग विरकर, माजी नगराध्यक्ष व रथाचे मानकरी श्रीमंत अजितराव राजेमाने, मुख्याधिकारी पंडीत पाटील, सपोनि मालोजीराव देशमुख, युवराज सुर्यवंशी,माजी नगराध्यक्ष विजय धट, सुरेश म्हेत्रे, मठाधिपती रविनाथ महाराज, पृथ्वीराज राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, जयसिंह राजेमाने, राहूल म्हेत्रे, धनाजी माने, बी एम अब्दागिरे, भगवानराव पिसे, सोमनाथ केवटे, यांचे सह रथाचे मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील म्हणाले, यात्रा ह्या समाजाच्या आनंदाचा उत्सव आहे. परंपरा ह्या माणसांनी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती नुसार मार्ग काढणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात यापूर्वी यात्राकाळात इतर ठिकाणी अपघाताच्या अनेक घटना घडल्या असल्याने प्रशासन खबरदारी घेतेय की जेणेकरुन कोठेही वाईट घटना घडू नये. यासाठीच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार यात्रा पार पाडून प्रशासनास मदत करावी. वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून रथमार्गासंबंधी चांगला निर्णय घेऊ रथ पाण्यात नेहू देणार नाही. कायद्याने मान्य न होणारी गोष्ट करु नये. बदल हा चांगल्यासाठी होतो. प्रशासनासाठी तुम्ही एक पाऊल मागे या प्रशासन तुमच्या साठी दहा पावले पुढे येईल असे आवाहन करत रथ ओढणार्या मानकर्यांनी रथ हा पर्यायी मार्गाने नेहून प्रशासनास सहकार्य करावे.
यावेळी बोलताना रथाचे मानकरी अजितराव राजेमाने म्हणाले श्रींचा रथोत्सव पूर्वापार नदीपात्रातून पाण्यातुनच जात आला आहे. तरी प्रशासनाचे म्हणणे पर्यायी बायपास रस्त्याच्या मार्गानेच रथ नेहण्याचे असेल तर रथाला भेटायला विविध ठिकाणच्या सासन काट्या येत असतात. त्यांच्या भेटीचे ठिकाण निश्चित करा व रथ मार्गावरील आडथळे दूर करावेत.
यावेळी रथ ओढणारे मानकरी यांनी पर्यायी रथ मार्गावरील विविध आडचणी प्रशासनापुढे उपस्थित केल्या. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी उपस्थितांचे आभार सपोनि मालोजीराव देशमुख यांनी मानले. दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी आज सिध्दनाथ मंदीर, यात्रा पटांगण, जुन्या व नवीन पर्यायी रथ मार्गाची चालत जावून पाहणी केली व संबंधिताना योग्य त्या सुचना दिल्या.