पाटण : पाटण तालुक्यातील तारळे विभागात असणार्या मुरूड येथील तारळी धरणाचा आपत्कालीन पायथा दरवाजा शुक्रवार दि. 6 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास निकामी झाल्याने तारळी धरणातून नदीपात्रात सरासरी 0.17 टीएमसी पाणी नदीपात्रात वाहून गेले. जलसंपदा विभाग व प्रशासकीय यंत्रणेला शुक्रवारी रात्री उशिरा 11.30 वाजण्याच्या सुमारास आपत्कालीन निकामी झालेला दरवाजा बंद करण्यात यश आले. तोपर्यंत धरणातील लाखो लिटर पाणी विना वापर नदी पात्रात वाहून गेले.
शुक्रवार दि. 6 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तारळी धरणाच्या आपत्कालीन पायथा दरवाजाला बिघाड झाल्याने हा लोखंडी दरवाजा तुटला व धरणातील पाणी नदीपात्रात वेगाने वाहू लागले ही वार्ता वार्यासारखी सगळीकडे पसरली असता जलसंपदा व प्रशासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी तारळी धरणाच्या भिंतीकडे धाव घेतली. धरण फुटल्याच्या अफवेने नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात धरणाजवळ गर्दी होवू लागली.
धरणाचे सहाय्यक अभियंता हेमंत घोलप व त्यांच्या पथकाने तसेच कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील यांनी नदीकाठवरील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला होता. धरणातील वाया जाणार्या पाण्याचा विसर्ग बंद करण्यासाठी जलसंपदा व शासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले होते. सरासरी 5.85 टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेल्या तारळी धरणातून शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 11.30 वाजेपर्यंत या 13 तासांच्या कालावधीत सुमारे 0.17 टीएमसी पाणी विनावापर नदीपात्रात वाहून गेले.
शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास पर्यायी लोखंडी असणारा दरवाजा बसविण्यास शासकीय यंत्रणेला यश आले व तारळी धरणातून वाया जाणारे पाणी अखेर बंद झाले. या दरवाजाचे पाहणी करण्यासाठी शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी तारळी धरणास भेट पाहणी करून झालेल्या प्रकाराचा आढावा घेतला.
गेल्या तीन-चार वर्षापासून तारळी धरणाची भिंत पाण्याने झिरपत असल्याच्या बातम्या प्रसिध्दी माध्यमातून प्रसिध्द झाल्या होत्या. तरी देखील जलसंपदा विभागाने या धरणाच्या बाबीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले. वेळेवर दरवाजाची व धरणाच्या झिरपत असलेल्या भिंतीची व्यवस्था केली असती तर आज हा प्रसंग उद्भवला नसता. मुळातच तारळी धरण बांधकामाच्या बाबतीत चर्चेत असताना अशातच हा प्रकार घडल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.