पाटण : तारळे विभागातील मुरूड येथील तारळी धरणाच्या आपत्कालीन गेटमध्ये शुक्रवार दि. 6 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने धरणातील पाण्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली. या गळतीमुळे तारळी धरणाच्या आपत्कालीन दरवाजातून लाखो लिटर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले. या गळतीमुळे तारळी नदी ओसांडून वाहू लागली असून तारळी नदीकाठावरील 18 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत धरणाचा आपत्कालीन दरवाजा बंद करून पाण्याचा विसर्ग थांबविण्याचा प्रयत्न सुरू होता.
दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पाटणच्या प्रांताधिकारी सुचिता भिकाणे, कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर, कराड पंचायत समितीचे सभापती व पाल खंडोबा यात्रेचे प्रमुख मानकरी देवराज दादा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच परिस्थितीची पाहणी करून पाण्याचा विसर्ग थांबविण्याच्या अधिकार्यांना सूचना केल्या.
तारळे विभागातील मुरूड येथे 2013 रोजी तारळी धरणाचे काम पूर्णत्वास गेले. 5.85 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या तारळी धरणात सध्या 4.24 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. तारळे विभागाला वरदायिनी ठरणार्या तारळी धरणामुळे तारळेसह परिसरातील 18 गावे सुजलाम सुफलाम झाली आहेत. या धरणाच्या वॉलमधून तारळेसह परिसराला पिण्यासाठी व सिंचनासाठी आवश्यकतेनुसार 300 ते 500 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत असते. मात्र पालीच्या यात्रेसाठी सिंचनाचा वॉल यापूर्वीच बंद करण्यात आला होता.
शुक्रवार दि. 6 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या धरणाच्या आपत्कालीन दरवाजामध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने धरणातील पाण्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली. या गळतीमुळे धरणाच्या आपत्कालीन दरवाजातून दिवसभरात लाखो लिटर पाण्याचा विसर्ग तारळी नदीपात्रात झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. याबाबतची माहिती परिसरात समजताच धरणस्थळावर बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. शासनाच्या यांत्रिकी विभागाकडून धरणाची वेळोवेळी तपासणी केली जात असताना असा प्रकार घडणे दुर्दैवी आहे. दरवाजाला लागलेल्या पाणी गळतीमुळे धरणाच्या तपासणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेटमधून पाण्याच्या विसर्गाला मोठ्या प्र्रमाणात प्रेशर असल्याने गेटचा दरवाजा बंद करण्यात यांत्रिक विभागाला अडचणी निर्माण होत असल्याची माहिती समजते.
चालूवर्षी तारळेसह परिसरात चांगला पाऊस झाल्याने तारळी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. या धरणामुळे संपूर्ण तारळे विभाग सुजलाम सुफलाम झाला असून हजारो एकर शेती ओलिताखाली आली आहे. उन्हाळ्यात तारळी धरण तारळे विभागाला वरदायिणीच ठरत असते. अशावेळी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती झाल्याने शेतकर्यांसह संपूर्ण तारळेभाग वासियांकडून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.
(छाया : शंकर मोहिते, पाटण)