वाई परिसरातून आणखी 9 जण बेपत्ता
सातारा: क्रूरकर्मा डॉ. संतोष पोळ याच्या खुणांची व्याप्ती विस्तारत चालल्याने पोलिसांनी हे प्रकरण अतिशय गांर्भीर्याने घेतले आहे. बुधवारी वाई पोलिस ठाण्यात आणखी तीन जण बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद झाली असून त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या हत्याकांडात पोळ याने फार्महाऊस घेण्याइतपत किती माया कमविली यासाठी त्याच्या 13 बँकांची खाती तपासणेकामी पोलिसांनी त्या बँकांशी पत्रव्यवहार केला आहे.
रुग्णांना जीवदान देणे हे खरे तर डॉक्टरचे कर्तव्य. परंतु, सातारा जिल्ह्यातील वाई येथील एका तथाकथित डॉक्टरने केलेला एक खून उघडकीस आल्यानंतर त्याने हा एकच नव्हे, तर यापूर्वी पाच महिलांच्याही निर्घूण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या डॉक्टरने अनैतिक संबंध आणि सोन्याच्या लालसेपोटी या हत्या केल्या असाव्यात, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी डॉ. संतोष पोळसह दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की इलेक्ट्रोपॅथीची बनावट पदवी घेतलेला संतोष पोळ वाई इथे वैद्यकीय व्यवसाय करतो.
दोन खड्डे कोणासाठी ?
डॉ. पोळने आणखी खून केले का
– डॉ. पोळबद्दल रोज नवे खुलासे होत आहेत. बुधवारी समोर आलेल्या माहितीनुसार, त्याच्या फार्महाऊवर दोन मोठे खड्डे सापडले. ते कोणासाठी होते, याचा शोध पोलिस घेत आहेत.
– त्याची नर्स ज्योती, हिलाही मारण्याचा प्लॅन त्याने आखला होता का, अशी शंका उपस्थित होत आहे.
– वाई आणि परिसरातून आणखी 9 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. पोलिस पोळची कसून चौकशी करत आहे.
अंगणवाडी सेविका आणि पूर्वप्राथमिक शिक्षिका संघाच्या राज्य शाखेच्या अध्यक्षा मंगल भिकू जेधे (49) या दोन महिन्यांपासून बेपत्ता होत्या. त्यांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. यादरम्यान, जेधे यांच्या मोबाइलवरील संभाषणावरून पोलिसांनी माग काढला. त्यानुसार डॉ. पोळ याच्याशी त्यांचे शेवटचे बोलणे झाल्याचे स्पष्ट आले. बेपत्ता झाल्याच्या दिवशी त्या उपचारासाठी डॉ. पोळ याच्याकडे आल्या होत्या, अशी माहितीही कुटुंबीयांकडून मिळाली. जेधे यांच्या कुटुंबीयांनाही डॉ. पोळ याच्यावरच संशय होता. पोलिस पोळ याची कसून चौकशी करत असताना तो मात्र उलट-सुलट उत्तरे देऊन तपास अधिकार्यांवरच आरोप करत होता.
की किडनी चोरीचे रॅकेट?
किडनी काढण्यासाठी हे खून केले असावेत, अशीही एक शक्यता आहे. डॉ.पोळ वाईतील प्रतिथयश डॉ. घोटवडेकर यांच्याकडे सात ते आठ वर्षे काम करत होता. त्याने मारलेली एक नर्स सलमा शेख ही घोटवडेकर यांच्या हॉस्पीटलमध्येच कामास होती.
डॉ.घोटवकडरांच्या रुग्णालयातील भूल वापरूनच त्याने हे खून केल्याची माहिती ज्योती मांढरे हिने दिली. त्यामुळे यामध्ये किडनी रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास पोलिस करत आहेत.