सातारा (शरद काटकर) : शासनाची ढिगभर पुरस्कार मिळविणार्या सातारा जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाची अवस्था एखाद्या क्षयरोग्याच्या सांगाड्यासारखी झाली आहे. आरोग्य विभागाचा सेनापती लढवय्या असला तरी अष्टप्रधान मंडळ आणि मावळ्यांच्या कमतरतेने सेनापतीला कर्तव्याची तलवार म्यान करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील 71 आरोग्य केंद्रांपैकी 10 प्राथमिक आरोग्य केंद्रात 53 वैद्यकिय अधिकारीच नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. सध्या आरोग्य सेवेचा बोजबारा उडाला असून आयसीयुमध्ये शेवटची घटका मोजणार्या आरोग्य सेवेला कधी अच्छे दिन येणार भगवान जाणे…!
सातारा जिल्हा परीषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी या खुर्चीवर विराजमान होण्याचा दुसर्यांदा मान मिळविला. डॉ. पवार यांनी सन 2009 ते 13 या चार वर्षाच्या कालखंडात आरोग्य विभागाची केलेली कामगिरी आजही ज्ञात आहे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. या कालखंडात नकुसा नामकरण सोहळा, लेक वाचवा अभियान आणि प्राथमिका आरोग्य केंद्रांच्या कायापालटाबरोबरच उपलब्ध करून दिलेल्या सुविधा हे उपक्रम राज्यात पायलट प्रयोग म्हणून राबविले गेले. जिल्ह्यात 71 प्राथमिक आरोग्य केंद्र तर 400 उपकेंद्रांचे जाळे पसरले आहे. दर्याखोर्यातील दुर्गम भागातील आम जनतेला आरोग्याच्या सुविधा गेल्या 8 ते 10 वर्षापुर्वी चांगल्या पध्दतीने पुरविल्या जात होत्या. अलिकडच्या काळात या विभागालाच विविध समस्यांनी ग्रासले असून आरोग्य सुविधाच कोम्यात जाते की, काय अशी भिती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 71 प्राथमिक आरोग्य केंदात 155 वैद्यकिय अधिकार्यांची पदे मंजूर असताना प्रत्यक्षात 102 वैद्यकिय अधिकारी कार्यरत असून 53 पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब चव्हाट्यावर आली आहे. कण्हेर, नांदगाव, बामणोली, लोणंद, म्हसवड, पुसेगाव, डिस्कळ, पुसेसावळी, किन्हई, पळशी, रहिमतपूर, सातारारोड या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारीच नसल्याने आरोग्य केेंद्रांची अवस्था देवा विना देवालय अशी होवून बसली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय सेवा बंद झाल्याने खाजगी दवाखान्यांना अच्छे दिन आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशांची लुट केली जात आहे. काही प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन ऐवजी एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने आरोग्य सेवेवर त्याचा परीणाम झाला आहे. शासकीय सलग सुट्यांमध्ये वैद्यकिय अधिकारीच दवाखान्यात उपलब्ध नसल्याने रूग्णांची जीवघेणी ससेहोलपट होत आहे. दोन अधिकार्यांचा कामाचा बोजा एका अधिकार्यावर पडत असल्याने अधिकारी वैतागले आहेत. यापुर्वी अत्यावश्यक औषधे खरेदी करण्याचे अधिकार जिल्हा परीषद पातळीवर होते तथापि शासनाच्या नव्या धोरणानुसार यावर अंकुश आला असून इच्छा असूनही औषध खाजगी विक्रेत्यांकडून खरेदी करता येत नसल्याने वैद्यकिय अधिकार्यांचे हात बांधले आहेत.
यासंदर्भात जिल्हा परीषद पदाधिकारी आणि सदस्य यांच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधांबाबत जनतेच्या तक्रारी वाढल्याने जिल्हा आरोग्य अधिकार्यांना ते धारेवर धरत असून रिक्त पदे शासनाकडून भरली जात नसल्याच्या साचेबंध उत्तराने सदस्यांचे तोंड बंद होत आहे. वैद्यकिय अधिकार्यांबरोबरच औषध पुरवठा देखिल आवश्यक तेवढा होत नसल्याने या दुसर्या त्सुनामी संकटाला आरोग्य विभागाच्या अधिकार्यांना सामोरे जावे लागत आहे. औषध निर्माण अधिकार्यांची 87 पदे मंजूर असताना 10 पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 3 पदे रिक्त आहेत. कुष्ठरोग तंत्रज्ञ 3 पदे व्यपगत होणारे पद असल्याने भरताच येत नसल्याचे समोर आले आहे. आरोग्य पर्यवेक्षकाची 18 पदे मंजूर असताना 6, आरोग्य सहाय्यक पुरूष 12 तर या पदाच्या पद्दोन्नतीसाठी पात्र उमेदवार उपलब्ध नसल्याने तब्बल 36 पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवेत महत्वाची भुमिका बजावणार्या आरोग्य सेवकाच्या 202 पदापैकी 108 पदे भरण्यात आली असून अद्यापही 94 पदे रिक्त आहेत. यामध्ये 74 पदे मंजूर असली तरी भरती प्रक्रियेनुसार 29 पदे भरता येतात. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 48 टक्के म्हणजे 14 पदे असतानाही आकृतीबंद अद्यापही निश्चित न झाल्याने यातील 50 टक्के जागा अद्यापही रिक्त असल्याचे समोर आले आहे. त्याच पध्दतीने आरोग्य सेवकांच्या 50 टक्के म्हणजे 253 जागांपैकी 113 पदे भरली गेली असली तरी अजूनही 140 पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये देखिल आकृतिबंद निश्चित न झाल्याने खुल्या प्रवर्गातील 9 जागांना कोलदांडा बसला आहे.
आरोग्य सेविकांची 696 पदे मंजूर असून सरळ सेवा भरतीने 414 पदे भरली असली तरी 282 जागा रिक्त असल्याने या कर्मचार्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कामाचा ताण पडला जात असून त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत असल्याने आम जनतेतून तक्रारींचा सूर वाढला आहे. बर्याचदा रूग्णांच्या नातेवाईकांनाच आरोग्य सेवकांच्या मदतीला धावावे लागत असल्याचे किस्से ऐकण्यास मिळत आहेत. आरोग्य सहाय्यीका, आरोग्य पर्यवेक्षक(महिला) छायाचित्रकार, सिनेयंत्रचालक या पदांमध्ये देखील रिक्त जागांची लक्षणीय संख्या आहे. एकूण 1567 पदांपैकी 977 सेवक सेवेत असून सर्व प्रवर्गाची 590 रिक्त असल्याने जिल्ह्यात आरोग्य सेवेचे तीन-तेरा वाजल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सातारा जिल्हा परीषदेत कार्यभार स्विकारल्यानंतर जि. प. पदाधिकारी, सदस्य आणि सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य सुविधेबाबत अपेक्षा वाढल्या आहेत.
यापुर्वीची कर्मचारी संख्या आणि सद्य परिस्थिती याला कशापध्दतीने डॉ. पवार तोंड देणार हा संशोधनाचा विषय आहे. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी एखादा नवा उपक्रम राबविताना कर्मचार्यांच्या कमतरतेचा फटका बसतोय की, काय अशी भिती व्यक्त केली जात आहे. दुसर्यांदा कार्यभार स्विकारणारे डॉ. पवार हे आरोग्य विभागाचे सेनापती आहेत. त्यांचे अष्टप्रधान मंडळ व मावळे कमी असल्याने आरोग्य सेवेचे शिवधनूष्य पेलण्याचे कडवे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेला केंव्हा अच्छे दिन येणार…. !
RELATED ARTICLES