सातारा: मतदार यादीमध्ये 18 ते21 वयोगटातील मतदारांसाठी यादीमध्ये नोंदणी करण्यासाठी 1 ते 31 जुलै या कालावधीत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी राजकीय पक्ष, विविध विभाग, आणि महाविद्यालयांनी जास्तीत जास्त अशा मतदारांची नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी साहेबराव गायकवाड यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला नायब तहसिलदार अतुल तांबोळी यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, महाविद्यालयाचे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.श्री. गायकवाड पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यात लोकसंख्येच्या प्रमाणात 46 टक्के मतदारांची संख्या आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत 8 जुलै व 22 जुलै या दिवशी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यादिवशी बीएलओ मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित राहतील. त्याचबरोबर 15 व 29 जुलै रोजी महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर शिबीरांचे आयोजन करावे व मतदार नोंदणी करावी. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेश घेतेवेळी प्रवेश अर्जासोबत नमुना क्र. 6 देउन तो भरुन घ्यावा. महिला, अपंग, वंचित तसेच तृतीय पंथी मतदारांची नोंदणीही यामध्ये करावी. राष्ट्रीय स्तरावर 1950 हा टोल फ्री क्रमांक असून सातारा जिल्ह्यासाठी 02162-226959 यावर अधिक माहितीसाठी संपर्क करावा असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.