फलटण: मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्वातंत्र्यपूर्व काळातील (1825 ते 1846) पत्रकारितेबरोबरच शिक्षण, समाजकारण, खगोलशास्त्र, इतिहास व पुरातत्त्व संशोधन यातील कार्य अभिमानास्पद असून त्यांच्या कार्याची स्मृती मुंबईमध्ये चिरंतन ठेवण्यासाठी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने सुचविलेल्या आवश्यक त्या कामांची पूर्तता करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापदी ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्याच्या शालेय शिक्षण, उच्चतंत्र शिक्षण, मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य या खात्यांच्या संबंधित अधिकार्यांना दिले.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी बाळशास्त्रींचे स्मरणकार्य व पत्रकारांच्या विविध अडचणींबाबत ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. त्याअनुषंगाने नुकतीच विधानपरिषदेतील दालनात ना.श्रीमंत रामराजे यांनी ना.विनोंद तावडे, संबंधित खात्यांचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे पदाधिकारी व विश्वस्त यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. त्याबैठकीप्रसंगी ना.श्रीमंत रामराजे यांनी वरील निर्देश दिले.
बैठकीच्या सुरुवातीस बेडकिहाळ यांनी संस्थेच्या विविध मागण्यांची सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये ज्येष्ठ शासकीय अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना द्यावयाच्या अर्थसहाय्य योजनेस दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान निधी असे नामरकरण करावे, शासनाच्या राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, टाऊन हॉल (मुंबई) येथे जांभेकरांचे तैलचित्र लावणेत यावे, बाळशास्त्री जांभेकर ज्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात पहिले भारतीय प्रोफेसर म्हणून होते त्या मुंबई येथील महाविद्यालयाचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर महाविद्यालय असे नामकरण करावे, नव्या पिढीला बाळशास्त्रींच्या कार्याची ओळख व्हावी यासाठी त्यांच्या कार्यावरील पाठाचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करावा, बाळशास्त्रींचे जन्मगाव असलेल्या पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस त्यांचे नाव देण्यात यावे, आद्य नवकवितेचे जनक बा.सी.मर्ढेकर यांचे जन्मगाव मर्ढे, ता.जि.सातारा हे कवितेचे गाव म्हणून सांस्कृतिक विभागाने विकसित करावे या मागण्यांचा समावेश होता.
या सर्व मागण्यांबाबत बैठकीमध्ये उपस्थितांसमवेत सविस्तर चर्चा करुन ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी संबंधित अधिकार्यांना या मागण्यांच्या पूर्ततेबाबतचे तात्काळ निर्देश दिले. महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष कृष्णा शेवडीकर यांनी यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाकडून वृत्तपत्रांच्या होणार्या द्विवार्षिक पडताळणीतील कागद खरेदीची बिले व व्हॅट संबंधीची प्रक्रिया लघु व मध्यम वृत्तपत्रांसाठी क्लिष्ट असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर पडताळणीतील ही बाब वगळण्याबाबतची शिफारस ना.श्रीमंत रामराजे यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
बैठकीप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्रसारमाध्यम व वृत्तपत्रे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी, आ.अनिल तटकरे, आ.शशिकांत शिंदे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त रमेश खोत, अमर शेंडे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कानिफनाथ ननावरे, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनिल माने यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.