औंध: विद्यार्थ्यांनी गणितीय उपकरणे, प्रकल्पातून साकारलेल्या संकल्पना निश्चितच प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन औंध शिक्षण मंडळाचे सचिव प्रदिप कणसे यांनी केले.
येथील औंध शिक्षण मंडळाच्या श्रीयमाई श्रीनिवास विद्यालयात थोर गणितीय शास्त्रज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीचे औचित्य साधून इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांनी सुमारे शंभरच्या वर गणितीय प्रकल्प, उपकरणांचे प्रदर्शन भरविले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मुख्याध्यापक एस.बी.घाडगे, उपमुख्याध्यापक एस.व्ही.कुंभार, पर्यवेक्षक डी.डी.घार्गे, प्रदर्शन संयोजक सी बी पवार,एस.पी जाधव, यु.एस.वाघमारे, सी.एस.साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना कणसे पुढे म्हणाले की, गणित हा विषय सर्वसाधारणपणे सर्वांचाच नावडता असतो मात्र शाळेतील गणित विभागाच्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन स्तुत्य उपक्रम राबविला आहे. अनेक विद्यार्थ्यांचा गणित हा विषय आवडता झाला असून हे सर्व श्रेय शिक्षकांच्या परिश्रमाचे आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी नावलौकिक प्राप्त करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विविध गणितीय कोडी,बेरीज गुणाकार मांडणी, भौमितिक सुत्रे व संकल्पनांची मांडणी करण्यात आली होती. यावेळी अनेक शाळांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी या प्रदर्शनास भेट दिली. सूत्रसंचालन सी.बी.पवार, एस.पी.जाधव यांनी केले. आभार यु.एस.वाघमारे यांनी मानले.
गणितीय प्रकल्प, उपकरणातून साकारलेल्या संकल्पना प्रेरणादायी:प्रदिप कणसे
RELATED ARTICLES