कराडला दि.24 ते 28 नोव्हें रोजी कृषी,औद्योगिक, पशु. पक्षी प्रदर्शनाचे आयोजन : महादेव देसाई

कराड: सालाबाद प्रमाणे याहीवर्षी दि. 24 ते 28 नोव्हें.या कालावधीत येथील शामराव पाटील बाजारतळावरील मैदानात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शेती उत्पन्नबाजारसमीतीचे सभापती महादेव देसाई यांनी दिली. यावेळी समितीचे संचालक अशोक थोरात सचिव बी.डी. निंबाळकर यांच्यासह इतर संचालकांची उपस्थिती होती.
देसाई पुढे बोलताना म्हणाले, बाजारसमितीच्या कार्यक्षेत्रातील तसेच परीसरातील शेतकरी बांंधवाना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्हणून समिती सन 2003 पासुन आजअखेर दरवर्षी दि. 24 ते 28 नोव्हें. या कालावधीत कृषी प्रदर्शन आयोजित करत असते. सालाबादप्रमाणे याही वर्षी समितीने रॉयल स्मार्ट इम्पेक्स या इव्हेंट मॅनेजमेंटच्या साहाय्याने सोळावे स्व.यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक पशु.पक्षी प्रदर्शन आयोजित केले आहे. दि. 24 रोजी सायं. 4 वाजता या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन शेतकर्‍यांच्या हस्ते होणार आहे.
दि. 25 रोजी सकाळी 9.30 वाजता माजी पणन संचालक डॉ.राम खर्चे यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. दि.26 रोजी रात्री 8 वा. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन कराड येथे सुरेश साखवळकर प्रस्तुत संत कान्होपात्रा या नाटकाचा मोफत प्रयोग होणार आहे. दि.28 रोजी साय. 4 वा. ज्येष्ठ कृषी संशोधक, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. राजाराम देशमुख यांंच्या हस्ते प्रगतशील शेतकर्‍यांचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात विविध प्रकारचे 300 स्टॉल असणार आहेत. यातील काही स्टॉल शेतकर्‍यांसाठी राखीव असतील. तसेच इतरे विविध प्रकारच्या स्टॉल मध्ये शेतीविषयक तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच या प्रदर्शनात गाई, म्हैस, बैल, शेळी, विविध प्रकारचे डॉग यांचे प्रदर्शन ही आयोजित करण्यात आले आहे. तरी शेतकरी, नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.