सातारा जिल्ह्यातील आठ नगर पालिका व सहा नगर पंचायतीसाठी गुडघ्याला बाशींग बांधलेल्या इच्छुकांना यावेळी उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरावे लागणार आहे. जिल्ह्यातील एकमेव अ वर्ग नगरपालिका असणार्या सातारा नगर पालिकेत आचारसंहितेचे नियम स्पष्ट करण्यासाठी प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांनी पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात विशेष बैठक घेतली आणि स्लाईड शो व्दारे उमेदवारी अर्ज तपशील निहाय कसा भरायचा याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. यंदा निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार प्रथमच ऑनलाईन अर्ज भरण्यात येणार असून जिल्हा प्रशासनाच्या कामात यामुळे छाननी प्रक्रीयेच्या दृष्टीकोणातून सुटसुटीतपणा व सोपेपणा येणार आहे. त्या संदर्भाने स्वाती देशमुख यांनी अनेक गोष्टी आपल्या मार्गदर्शनामध्ये स्पष्ट केल्या. या बैठकीस नगराध्यक्ष विजय बडेकर यांच्यासह मुख्याधिकारी शंकरराव गोरे, सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद अॅड. दत्ता बनकर, नगर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अविनाश कदम व दोन्ही आघाड्यांचे नगरसेवक अनेक इच्छुक उमेदवार विविध संघटनांचे प्रतिनिधी व कर्मचारीवर्ग उपस्थित होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वाती देशमुख यांनी सुत्रे हाती घेतली असून बुथ लेवल ऑफीसर म्हणून 80 कर्मचार्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. या जबाबदारीचे व्यवस्थापन कसे करायचे याचे सुमारे दिड तास सखोल मार्गदर्शन देशमुख यांनी आपल्या बैठकीत केले. एका प्रभागातून एका डिपॉझीटवर कमाल चार नामनिर्देशनपत्रे सादर करणे आवश्यक आहे. राखीव प्रभागात निवडणूक लढवण्यासाठी प्रमाणपत्र (जात पडताळणीचे) देणे आवश्यक असून ते नसल्यास उमेदवाराचा अर्ज छाननी प्रक्रियेत बाद समजला जाणार आहे. याचे स्पष्ट निर्देश स्वाती देशमुख यांनी दिले. ऑनलाईन फॉर्म सादर करणेकामी हेल्प डेस्क स्थापन करण्यात येणार असून या डेस्कमध्ये तीन कर्मचार्यांचा समावेश करण्यात आला आहे. वीस प्रभागासाठी नामनिर्देशनपत्र भरणे कामी 10 पथके नेमण्यात आली असून त्या यंत्रणेव्दारेच ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी देशमुख यांनी मुद्दे निहाय माहिती दिली. नामनिर्देशनपत्राचे भाग एक, दोन, तीन व चार या प्रत्येक भागातील दहा मुद्द्यांचे त्यांनी सविस्तर विश्लेषण केले. तसेच अधिकृत चिन्हांचा चार्ट नगरपालिकेकडे प्रसिध्द करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या व जोड पत्र एक व दोन संदर्भातही महत्वाच्या सूचना देवून ते सादर करताना मुळ प्रतीतच सादर करण्याचे बंधनकारक आहे. त्याची झेरॉक्स सादर करणे योग्य नाही असे त्या म्हणाल्या. बॉलपेनच्या सहीने 29 नोव्हेबर 2016 रोजी दुपारी 3 पूर्वी या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याचे निदेशीत करण्यात आले आहे. खुुल्या गटातील अथवा प्रवर्गातील उमेदवारांना अनामत किती भरावयाची या प्रश्नाचे उत्तर स्वाती देशमुख यांनी दिले नाही. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून कोणतेही निदेष अद्याप आले नसल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारांनी निवडणूकींचा दैनंदिन खर्च दुसर्या दिवशी दोन वाजेपर्यंत कटाक्षाने सादर करायचा आहे, असे निदेश दिले. उपस्थितांमधून अविनाश कदम, अॅड. दत्ता बनकर, अभिजीत बिचूकले, नरेंद्र पाटील, विठ्ठल बलशेटवार, निमिष शहा यांनी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून देशमुख यांच्याशी चर्चा केली. ऑनलाईन प्रक्रिये दरम्यान सर्व्हर डाउन झाल्यास काय करायचे? वॉर्ड क्रमांक सहा मध्ये प्रत्यक्ष संबंधित नगरसेवक अपात्र ठरलेला असताना व त्याने फॉर्म भरल्यास काय कारवाई होवू शकते असे प्रश्न विचारले गेल्याने स्वाती देशमुख यांच्या आवाजाचा पारा चढला, असे प्रश्न तुम्ही विचारु शकत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले. अर्ज भरताना उमेदवारांनी कोणती काळजी घ्यावयाची यावरही देशमुख यांनी मार्गदर्शन केेले.
आचारसंहितेचे सर्वच उमेदवारांनी तंतोतंत पालन करावे. कोणतीही तक्रार दाखल झाल्यास पूर्ण चौकशी करुनच पुढील कारवाईची दिशा ठरवण्यात येईल असे प्रांताधिकार्यांनी सांगत नंतर बैठक आटोपती घेतली. मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी बैठकीनंतर बीएलओंच्या माध्यमातून पालिका निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेतला.
पालिका निवडणूकींमध्ये उमेदवारी अर्ज ऑनलाईन
RELATED ARTICLES