सातारा : सर्वसामान्य शेतकरीही वातानुकूलीत एसटीमधून बसला पाहिजे. त्यासाठी भविष्यात सर्व एसटी वातानुकूलीत असतील. प्रवाशी हा अन्नदाता आहे, या जाणीवेतूनच मी महामंडळाकडे पाहतोय हीच जाणीव तुम्हीही ठेवली पाहिजे, असे आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नवीन इमारतीच्या कार्यालयाचे उद्घाटन खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात परिवहनमंत्री श्री. रावते बोलत होते. या कार्यक्रमास प्रादेशिक व्यवस्थापक सुहास जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नितीन बानुगडे-पाटील, महेश शिंदे, हणमंतराव चौरे, रणजितसिंह भोसले, हर्षल कदम, नंदकुमार घार्गे, शारदा जाधव, किशोर पंडीत, आनंदराव पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. एसटी दुर्घटनेतील दिवंगतांना सर्वप्रथम श्रद्धांजली वाहून आणि ज्येष्ठ यांत्रिक कारागीर भागवत खरे यांचा सन्मान करुन परिवहनमंत्री श्री. रावते पुढे म्हणाले, ज्या चालकाच्या जीवावर 40 जाणांचे जीवन अवलंबून आहे, अशा चालकाला विश्रामगृहाची सोय करण्यात येत आहे. बसस्थानकावरील स्वच्छतागृहे ही सुस्थितीत आणि स्वच्छ असतील. यापुढे एसटी फायद्यात चालली पाहिजे. खासगी प्रवाशी वाहतुकीला तोडीस तोड तोंड दिले पाहिजे या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरु आहे. सर्वसामान्य शेतकरी वातानुकूलीत गाडीमध्य बसला पाहिजे. त्यासाठी भविष्यात सर्व गाड्या वातानुकूलीत असतील.
एकवेळ क्षमा केली पाहिजे या भावनेतून साडेसतारा हजार बडतर्फ कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, कामगारांसाठी प्रशिक्षणही सुरु करतोय. यांत्रिक कारागीरांना परदेशात पाठविण्यात येणार आहे. चालकासाठी केबीनमध्ये पंखे बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एसटी माझी आहे. माझ्या गावात आली पाहिजे या भावनेने आपण सर्वजन मिळून एसटीला पुढे नेवू, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवू, असेही ते शेवटी म्हणाले. श्री. बानुगडे-पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते यावेळी म्हणाले, गावागावातील तिर्थ स्थळे, पर्यटन स्थळे जोडून ठेवण्याचे काम एसटीने केले आहे. जिल्ह्याच्या आर्थिक व सामाजिक विकासात एसटीचे मोलाचे योगदान आहे. खेड्यापाड्यात दळण-वळण ठेवणारी एसटी राज्याच्या रक्त वाहिनीचे काम करत आहे.
विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी प्रास्ताविक केले. तर कार्यकारी अभियंता विद्या भिलाकर यांनी सर्वांचे आभार मानले.